कृषि विभागाच्या पथकांची भरारी कागदावरच 

Sakal Exclusive
Sakal Exclusive

शहादा (नंदुरबार) : कृषी निविष्ठांमध्ये व कापसाच्या बोगस बियाण्यात फसवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्याभरात सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने तालुक्यात नाममात्र एक कारवाई करत इतर बोगस बियाणे विक्रेत्यांना मात्र मोकाटच सोडले. त्याचाच परिपाक म्हणून शेकडो एकरवर विक्रीचा परवाना नसलेले अनधिकृत कापसाचे बियाणे शेतकऱ्यांच्या शेतात अंकुरले आहे. विक्रेते बोगस बियाणे विकून मोकळे झाले. यात मात्र बळीराजाची फसगत झाली. त्यामुळे पुन्हा बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. 

जिल्ह्याभरात मान्सूनपूर्व कापसाच्या लागवडीस वेग आला आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली आहे. त्यात शेजारील राज्यातून आलेले व विक्रीस प्रतिबंध असलेले कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून बहुतांश विक्रेत्यांनी विकले. शेतकऱ्यांना त्यातले पाहिजे तसे ज्ञान नसल्याने त्यांनीही ते स्वीकारले. वास्तविक पाहता कृषी विभागाने शेतकऱ्यांना गावोगावी अनाधिकृत बियाणे खरेदी करु नये असे आवाहन करणे आवश्यक होते. परंतु शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणे पोहोचलेच कसे हा संशोधनाचा विषय आहे. मुळात या सर्व व्यवहारामागे नेमका हात कोणाचा आहे हेही तपासणे गरजेचे आहे. 
राज्य शासनाने परवानगी नाकारलेल्या लाखो रुपयांचे परवाना नसलेल्या कापूस बियाणे साठवून ठेवल्यानंतर त्याची सर्रास विक्री होते हे संबंधित विभागाला ज्ञात नसावे का? दरवर्षी लाखो रुपयांचे बियाणे सर्रास विकले जाते कृषी विभाग कारवाई का करत नाही हे तपासणे गरजेचे आहे. 

गेल्या वर्षी चार, यंदा एकच 
गेल्यावर्षी शहादा तालुक्यात चार ठिकाणी अवैधरित्या बोगस कपाशीचे बियाणे विकणाऱ्यांवर कृषी विभागाने छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बियाणे विक्री होते असे सिद्ध होते. कारवाईनंतर संबंधित विक्रेत्यांवर वचक निर्माण होणे अपेक्षित होते. याउलट यंदा मात्र लाखोंचे बियाणे बिनदिक्कतपणे विकले गेले. कारवाई मात्र एकावरच झाली. आजपर्यंत संबंधित विभागाला एकच विक्रेता सापडला असावा का? जिल्ह्याभरात हजारो पाकिटांची विक्री झाली असल्याचे समजते. काही ठिकाणी बोगस बियाणे अंकुरलेही. या घटनेचा खोलात जाऊन तपास करणे अपेक्षित होते. परंतु एक नाम मात्र कारवाई करून प्रशासनही मोकळे झाले. शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. जिल्ह्याभरात असे अनेक बोगस बियाणे विक्रेत्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता आहे. त्याच्या शोध प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यात एकच कारवाई ? 
यावर्षी शहादा तालुक्यात एका अनधिकृत कापूस बियाणे विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. जिल्हाभरात फक्त शहादा तालुक्यातच बोगस बियाणे विकले जाते का? इतर ठिकाणचा विक्रेत्यांकडून नियमानुसार अधिकृत परवाना असलेलेच बियाण्यांची विक्री होते का याचीही तपासणी करणे गरजेचे आहे. तालुक्यात आजपर्यंत ग्रामीण भागात अनेक विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विकले गेल्याचे समजते. मात्र संबंधित भरारी पथकाला याचा मागमूसही नसणे म्हणजे आश्चर्य म्हणावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com