कोरोनाचा कहरः शहाद्याचीही रेडझोनकडे वाटचाल सुरू 

दिनानाथ पाटील
Monday, 20 July 2020

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तालुक्याची सीमा सील केली. तसेच गेल्या आठवड्यात चार दिवस लॉकडाउन करण्यात आले होते. कोरोनाची साखळी तुटत नसल्याने जिल्हा प्रशासनाने दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे.

शहादा  : तालुक्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, रुग्णांची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. शहादा तालुका आता हॉटस्पॉट होऊ पाहत आहे. प्रशासनाची उपाययोजना व नागरिकांचे सहकार्य असतानाही संपर्क साखळी तुटत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्याची सीमा सील असतानाही आढळून येणाऱ्या रुग्णांचे कोरोना कनेक्शन अन्य हॉटस्पॉट शहरांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

एप्रिलच्या मध्यावर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाली. त्यात एकाचे निधन झाले, तर बाकीचे उपचारांती बरे होऊन घरी परतले. तालुक्याच्या सीमेलगत असलेले धुळे, शिरपूर, नाशिक, सुरत, अंकलेश्वर (गुजरात) ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने हळूहळू शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरवले. तीन महिन्यांत कोरोनाचे ७९ रुग्ण आढळून आले. उपचारांती बरे होणाऱ्यांचा रेशो ५० टक्के असला तरी महिन्याला २५ रुग्ण हा आकडा मनात धडकी भरविणारा आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तालुक्याची सीमा सील केली. तसेच गेल्या आठवड्यात चार दिवस लॉकडाउन करण्यात आले होते. कोरोनाची साखळी तुटत नसल्याने जिल्हा प्रशासनाने दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. सद्यःस्थितीत शहरात चोवीस व ग्रामीण भागातील चार मिळून तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ आहे. यातील अपवाद वगळता त्याच्यातील व नुकतेच निधन झालेल्या दोघांचे कनेक्शन धुळे, शिरपूर, नाशिक, सुरत, अंकलेश्वर, बडोदा आदी शहरांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याच्या सीमेवर सर्वांची तपासणी होते. अधिकृत पासशिवाय परवानगी नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव का व कसा वाढतोय, याचा शोध घेणे आवश्यक आहे. अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांना आरोग्य तपासणीसह सक्तीने क्वारंटाइन करणे आवश्यक आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक भीतीपोटी घरगुती उपचार घेत असल्याची चर्चा आहे. त्यातून कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने घरोघरी सक्तीची आरोग्य तपासणी सुरू करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता, येत्या काही दिवसांत शहादा शंभरी पार करीत नंदुरबारला मागे टाकण्याची भीती व्यक्त होत आहे. 

एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ः ७९ 
उपचार घेत असलेले ः ३१ 
जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेले ः 3 
निधन झालेले रुग्ण ः ८ 
बरे झालेले रुग्ण ः ३७  

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada corona patient number crossed 79, red zon by journey