आता शहाद्यातच घेणार कोरोना संशयितांचे नमुने 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

प्राथमिक माहिती घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी येथे भेट देत पाहणी केली. नमुने गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज नंदुरबार येथे प्रशिक्षण देण्यात आले. 

शहादा : शहरातील कोरोना विषाणूच्या संशयित व्यक्तींचे स्वँब तपासणीच्या दृष्टीने नमुने घ्यायची सुविधा उद्या (ता.१) पासून शासनातर्फे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठीची प्राथमिक माहिती घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी येथे भेट देत पाहणी केली. नमुने गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज नंदुरबार येथे प्रशिक्षण देण्यात आले. 
शहरातील ६३ नागरिकांचे अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले असून त्यापैकी ५४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी दिली. 
शहरात कोरोनाग्रस्त नऊ रुग्ण आढळून आल्याने नागरिक भितीच्या वातावरणात वावरत आहेत. जिल्ह्यात येथील ही सर्वाधिक संख्या असल्याने प्रशासनातर्फे कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. रुग्ण संख्या वाढल्याने डॉ. भोये यांनी शहाद्याला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. क्वारंटाईन कक्षाचीही पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. 

आतापर्यंत शहाद्यातील संशयित रुग्णांना स्वॕब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नंदुरबार येथे न्यावे लागत होत. मात्र, उद्या (ता. १) पासून शहाद्यातच संशयित रुग्णांचे नमुने घेण्याची सुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध होत आहे. यातून प्रशासनाचा वेळ वाचण्यासह अहवाल लवकर उपलब्ध होईल. स्वॕबचे नमुने घेण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागातील नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात आज प्रशिक्षण देण्यात आले. 

शहरातील किती व्यक्तींचे अहवाल यायचे बाकी आहेत किंवा तपासणीसाठी पाठविले याची कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे दररोज सायंकाळी नागरिक आता माध्यम प्रतिनिधींनी आज काय अशी विचारणा करीत आहेत.सोमवारी येथील अब्दुल हमीद चौकात कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची तपासणीसाठी गेलेल्या वैद्यकीय पथकाशी हूज्जत घालणाऱ्या सहा नागरिकां विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे अशी माहिती डॉ. गिरासे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada covid testing lab suspected