esakal | पपई वजनाला भारी; तरीही भावामुळे शेतकऱ्यांना परवडेना
sakal

बोलून बातमी शोधा

farmer papaya

उत्तर भारतात पपईचा दर २० रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या मानाने जिल्ह्यात पपई खरेदीसाठी आलेले व्यापारी शेतकऱ्यांचा माल मातीमोल भावाने खरेदी करीत आहेत.

पपई वजनाला भारी; तरीही भावामुळे शेतकऱ्यांना परवडेना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहादा (नंदुरबार) : बदललेले निसर्गचक्र, पिकांवर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव, उत्पादनासाठी झालेला मोठा खर्च, त्यामानाने मिळणारा मातीमोल दर, ना फळ पीकविमा, ना कुठली मदत अशा विविध कारणांनी पपई उत्पादक शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. दरवर्षी व्यापारांच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात शेतमाल विकावा लागतो. दराबाबत स्वतः व्यापाऱ्यांशी झगडावे लागते. याबाबत शासनाने लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. 
उत्तर भारतात पपईचा दर २० रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या मानाने जिल्ह्यात पपई खरेदीसाठी आलेले व्यापारी शेतकऱ्यांचा माल मातीमोल भावाने खरेदी करीत आहेत. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, पीक परवडेनासे झाले आहे. या वर्षी विविध आजारांमुळे फळधारणा कमी झाली आहे. शिवाय खर्चही जादा लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पपईचे उत्पादन येण्याअगोदरच पिकावर नांगर फिरवला. त्यामुळे सहाजिकच उत्पादन घटले. 

उत्तर भारतात मागणी 
सध्या पपईला उत्तर भारतात मागणी असून, अधिक दर मिळत आहे. त्या मानाने स्थानिक शेतकऱ्यांना अल्प दर मिळतो. राज्यातील सर्वाधिक पपईची लागवड नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यात चार हजार ८६९ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली आहे. जिल्हा पपई उत्पादनाबाबत हब होऊ पाहत आहे. मात्र, पिकावर डाऊनी, रिक्षा किडीचा प्रादुर्भाव, विविध विषाणूजन्य आजारामुळे खर्चही निघणे अवघड आहे. त्यात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या पिळवणुकीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंगावले आहे. 

दरवर्षी संघर्ष पुजलेलाच 
पपईचे उत्पादन येण्याअगोदर दराबाबत पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात दरवर्षी संघर्ष होत असतो. गेल्यावर्षी दर ठरविण्याबाबत १३ वेळा बैठका झाल्या होत्या. या वर्षीही पहिली बैठक नुकतीच झाली. यासाठी शेतकऱ्यांनी पपई उत्पादक संघर्ष समितीही स्थापन केली आहे. व्यापारी व समिती यांच्यात बैठक होऊन दरवर्षी दराबाबत तोडगा काढला जातो. स्वतः शेतकऱ्यांना झगडावे लागते. शासनाने व्यापाऱ्यांवर वचक ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांची पिळवणूक नित्यनेमाने होतच राहील. पपई नाशवंत पीक असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांसमोर झुकावे लागते. त्यामुळे आजही व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. 

शासनाने लक्ष देण्याची गरज 
राज्यात १३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड झाली आहे. पपई बहुवार्षिक नसल्याने त्याला फळ पिकातून वगळण्यात आले. पूर्वी पपईचा उपयोग रासायनिक कंपन्यांमध्ये जास्त होत असे. आता पपईचे विविध वाण झाल्याने खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. शिवाय औषधीसाठी ही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पपईत अनेकविध गुणधर्म असल्याने शासनाने या पिकाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

जिल्ह्यातील पपई लागवड हेक्‍टरमध्ये 
नंदुरबार : एक हजार १६९ 
नवापूर : ७.४० 
शहादा : ३३१५ 
तळोदा : ३७१ 
अक्कलकुवा : ७.०० 
एकूण : ४८६९.४०