esakal | पपईला प्रथमच १३ रुपये ५१ पैसे दर निश्‍चित 
sakal

बोलून बातमी शोधा

papaya

पपई पिकाला चांगला दर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; परंतु शेतकऱ्यांनीही एकत्रित येणे गरजेचे आहे. सहकार्य अपेक्षित आहे. अजूनही दर वाढवून मिळाला असता; परंतु काही शेतकऱ्यांना तोडणीची घाई असल्याने दराबाबत जास्त संघर्ष करता आला नाही. ठरलेल्या दराप्रमाणे तोडणी करावी. कमी दराने तोडणी करू नये. 
- भगवान पाटील, पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती. 

पपईला प्रथमच १३ रुपये ५१ पैसे दर निश्‍चित 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहादा : पपई फळांची टंचाई पाहता, उत्तर भारतातील बाजारात दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांनाही व्हावा यासाठी पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त बैठक होऊन आठवड्याचा सरासरी भाव काढत १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. पपईच्या भावात होणारी वाढ पाहता, उत्पादक शेतकऱ्यांना बरे दिवस येतील, असे म्हणायला हरकत नाही. शेतकऱ्यांनी या दरानुसारच पपईची तोडणी करावी, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती सुनील पाटील, सचिव संजय पाटील, पपई उत्पादक संघर्ष समितीचे सदस्य भगवान पाटील, अनिल पाटील, राजू पाटील, विश्वनाथ पाटील, फुलभाई पाटील आदींसह शिरपूर, नंदुरबार, तळोदा परिसरातील शेतकरी सदस्य व शेख हाजी नाजीम हाजी सरताज, हाजी इक्बाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदींसह व्यापारी प्रतिनिधींची बुधवारी (ता. ५) रात्री उशिरापर्यंत भाववाढीबाबत चर्चा झाली. चर्चेअंती १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. 

राज्यासह उत्तर भारतात अतिवृष्टीमुळे पपईच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळधारणाही किमान झाली. जिल्ह्यात पपईचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. पपईवर व्हायरससह डाउनीमुळे उपादनात ५० टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली आहे. रोज जिल्ह्यातून पपईच्या सरासरी शंभर गाड्या जात होत्या; ती संख्या सध्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. त्यामुळे मागणी वाढत असल्याने दरही वाढून मिळावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. गेल्या आठवड्यातही संयुक्त बैठक झाली होती. तीत ११ रुपये ७५ पैसे भाव ठरवण्यात आला होता; परंतु उत्तर भारतातील बाजारपेठेत वाढणारा भाव पाहता, संघर्ष समितीने पुढाकार घेत आठवड्याचा सरासरी भाव काढून शेतकऱ्यांना भाववाढ मिळवून दिली. 
 
प्रथमच चांगला दर... 
कधी दोन रुपये, कधी तीन, तर कधी पाच रुपये या दराने आजपर्यंत उत्पादक शेतकरी पपईची विक्री करत होता; परंतु यंदा प्रथमच पपईला चांगला भाव मिळत आहे, तरीही पपई पिकावर झालेला खर्च व मिळणारे अपेक्षित उत्पादन पाहता, भाववाढ समाधानकारक नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांना बाजारपेठेतील स्पर्धात्मक दरांची माहिती नसल्याने नुकसान होते. महानगरांमध्ये ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे पपईची विक्री सुरू आहे.