esakal | सरकार पाच वर्ष पुर्ण करेल; जिल्‍ह्‍यातही चित्र बदलण्याची वेळ : अनिल देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

एकेकाळी जिल्ह्यात पक्ष बलवान होता. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा पायाभरणी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.

सरकार पाच वर्ष पुर्ण करेल; जिल्‍ह्‍यातही चित्र बदलण्याची वेळ : अनिल देशमुख

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : राज्यात महाविकास आघाडी सरकारचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पाच वर्षाचा कार्यकाळ सध्याचे सरकार पूर्ण करेल. अफवांवर विश्वास ठेवू नका. एकेकाळी जिल्ह्यात पक्ष बलवान होता. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा पायाभरणी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. गट तट बाजूला सारून एकदिलाने काम करून एक ध्येय निश्चित ठेवल्यास जिल्ह्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही; असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख शहादा दौऱ्यावर आले असता लोणखेडा येथील पाटीदार मंगल कार्यालयात राष्ट्रवादीतर्फे आयोजित पक्षाच्‍या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, नरेंद्र पाडवी, कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राष्ट्रवादीचा महिला जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, किरण शिंदे, नगरसेवक इक्बाल शेख, सागर तांबोळी, कमलेश चौधरी, जकीरमिया जहागीरदार, अमृत लोहार,शांतीलाल साळी, चंद्रकांत पाटील, एन. डी. पाटील, सुरेंद्र कुवर, नितीन पाडवी, ॲड अश्विनी जोशी, पुष्पा गावित, रविंद्र मुसळदे, अलका जोंधळे, दीपा पाटील, नवनवीन पवार, सुभाष शेमळे, सुरेखा वाघ, जगदीश वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु कालांतराने काहींनी पक्षांतर केल्याने सध्या राष्ट्रवादीची अवस्था जरी कमी असली तरी पक्षातल्‍या शिलेदारांनी पक्ष मजबुतीसाठी एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ खडसे यांचा फायदा महाराष्ट्रात होणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला ताकत मिळणार आहे. संपूर्ण खानदेशात त्यांच्यामुळे वेगळेच चित्र निर्माण होणार आहे. कोरोनाच्या काळात शासनाच्या निर्देशाचे नागरिकांनी पालन केल्यास कोरोनाला हद्दपार करू शकतो. यासाठी नागरिकांनी शासनाने केलेले निर्देशांचे पालन करावे असे आवाहन करून जिल्ह्यातील चित्र बदलण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्‍यांनी केले. 

जिल्ह्यात व्यक्ती केंद्रीत राजकारण : खडसे
खडसे म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यावर काँग्रेसचे प्रभुत्व कायम राहिले. जिल्ह्यातील एकही गाव असे नाही; जिथे नाथाभाऊ पोहोचला नाही. गेल्या काळात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. जंगलात मुक्काम केला, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास आहे. नंदूरबार जिल्ह्यात पक्ष केंद्रीत राजकारण नसून व्यक्तिकेंद्रीत राजकारण आहे. पक्षापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व आहे. डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हिना गावित यांना भाजपात त्यावेळी मीच आणले. सर्वांनी एकदिलाने काम करून पक्ष मजबूत करायचा आहे. गट तट विसरुन कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवा व पक्षाची नव्याने बांधणी करा असा सल्लाही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यापुढील कोणतीही निवडणूक आली त्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला गेला पाहिजे. पक्षात अनेक जण येण्यास इच्छुक आहेत. परंतु सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामुळे अडचण येत आहे. भविष्यात या भागात मोठा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश निश्चित करू. गेल्या चाळीस वर्षात भाजपा वाढवली अनेक मान अपमान सहन केलेत आता त्यांचे उटणे काढण्याची वेळ आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे