
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
शहादा (नंदुरबार) : हो-नाही म्हणत अखेर तब्बल आठ महिन्यांनंतर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी (ता. २३) शाळेची पहिली घंटा वाजली. अनेक महिन्यांपासून सुने सुने असलेले क्रीडांगण, वर्ग विद्यार्थ्यांच्या हजेरीने गजबजले. सोमवारी पहिल्याच दिवशी उपस्थिती कमी असली, तरी हजर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारी शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार शाळांमध्ये उपाययोजना करून वर्ग भरविण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांची गैरहजेरी दिसली. शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मामीटरने तपासणी करूनच शाळेच्या आवारात प्रवेश दिला. त्याचबरोबर ऑक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर, साबण आदींची व्यवस्थाही शाळांमध्ये करण्यात आली आहे.
कोरोनाबाबत जनजागृती
येथील (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना क्रीडांगणात शारीरिक अंतर ठेवत उभे करण्यात आले. त्यांना कोरोनाबाबत घ्यावयाची काळजीबाबत प्राचार्य आय. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क परिधान करूनच शाळेत यावे, अशाही सूचना देण्यात आल्या. एका बाकावर एक विद्यार्थी, अशी बैठकव्यवस्था करण्यात आली होती.
शाळा सुरू झाली असली तरी जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाइन अध्यापनही सुरू राहणार आहे. शालेय प्रशासनाने शासन निर्देश, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून वर्ग भरविले आहेत.
-प्रा. आय. डी. पाटील, प्राचार्य, (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय शहादा
संपादन ः राजेश सोनवणे