मनुखे, चहाचा कप महागात पडेल--- ते विकणारे दोघे पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सीमावर्ती भागातील नागरिकांनी आजारी नातेवाइकांना शिरपूरला न नेता शहादा येथे आणावे. पोलिस पाटील यांनीही आरोग्य विभागाला याची सूचना द्यावी असे कळविले आहे. 
- डॉ. चेतन गिरासे, प्रांताधिकारी. 

शहादा : येथील मनुखे विकणारा व चहाची टपरीधारक अशा दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून शहादेकरांनी धसका घेतला आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आता आपला नंबर तर लागणार नाही ना या चिंतेत आहेत. जो तो एकमेकांशी संपर्क साधून प्रशासकीय हालचालींची माहिती घेत आहेत. गणेशनगरमधील काही कुटुंब त्या चालकाचा अहवाल आल्याबरोबर कोणालाही समजू न देता गावी गेल्याची चर्चा आहे. 

येथील गणेशनगरमधील रहिवासी व ॲम्बुलन्स चालकाचा मेहुणा व भाचीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करावयास सुरूवात केली. मात्र ही माहिती मिळाल्याबरोबर काही कुटुंब बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात येते. या कुटुंबांपैकी काही व्यक्ती दररोज रात्री एकत्र बसायचे. त्यामुळे या परगावी गेलेल्या व्यक्तींनी किमान होम क्वारंटाईन होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती. 
संबंधित मेहुणा हा नोकरी सोबतच मणुखे (बेदाणे) व वह्यांच्या विक्रीचा जोड व्यवसाय करत असे. त्याने अनेकांना मणुखे व वह्या घरपोच दिल्या आहेत. त्यामुळे मणुखे व वह्या खरेदी करणाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. आपल्याला कोरोनाची लागण व्हायला नको म्हणून अनेकांनी मणुखे कचऱ्यात फेकून धन्यता मिळवली. हाच व्यक्ती एका धार्मिक स्थळात सेवेकरी होता. काहींना दररोज पुजेचा प्रसाद पोहचविण्याचे पुण्य कामही त्याने केले, त्यामुळे आपला नंबर तर लागणार नाही ना या चिंतेने त्याच्या संपर्कातील अनेक व्यक्ती एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत असल्याची खमंग चर्चा शहरात कर्णोपकर्णी आहे. 

पॉझिटीव्ह आलेल्याची गणेशनगरमध्ये एका मोठ्या शॉपिंग कॉप्लेक्समध्ये चहाची टपरी आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून चहासाठी दिवसभर येथे गर्दी असते. त्यामुळे अनेकांचे चेहरे उतरले आहेत. एक चहाचा कप महागात पडतो की काय यावरच तेथील व्यापारी व आस्वाद घेणाऱ्यांची मनस्थिती दर्शवित आहे. सध्या या टपरीधारकाच्या नजीकच्या नऊ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असले तरी नजीकच्या दिवसात ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada tea and manuka stoll parson corona positive