esakal | शाळा बंद तरीही शिक्षकांना द्यावा लागणार अहवाल 
sakal

बोलून बातमी शोधा

teacher report online work

राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सद्यःस्थितीमध्ये शाळा व महाविद्यालये बंद असली, तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.

शाळा बंद तरीही शिक्षकांना द्यावा लागणार अहवाल 

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : सध्या कोविड-१९ मुळे प्रत्यक्ष शाळा बंद आहेत. परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना शिक्षण दिले त्यासाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील, उच्च माध्यमिक विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा साप्ताहिक ऑनलाइन व ऑफलाइन अध्ययन- अध्यापन अहवाल आता शासनास सादर करावा लागणार आहे. त्यासाठी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी पत्र काढले आहे. 

राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सद्यःस्थितीमध्ये शाळा व महाविद्यालये बंद असली, तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. याचसोबत राज्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध ऑनलाइन फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, डिजिटल साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गृह भेटीच्या माध्यमातून, शिक्षक मित्र या उपक्रमाच्या मदतीने आणि अशा अनेक विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. 

माहितीचे साप्ताहिक संकलन 
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक करत असलेल्या या प्रयत्नांची उपक्रमांची माहिती राज्य शासनास तसेच केंद्रशासनास व इतर राज्यांच्या बैठकीत सादर करण्याच्या दृष्टीने http://covid19.scertmaha.ac.in या लिंकच्या पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकनिहाय ऑनलाइन व ऑफलाईन अध्ययन अध्यापन पद्धतीच्या माध्यमांच्या माहितीचे साप्ताहिक संकलन केले जाणार आहे. हे पोर्टलवर जाऊन शिक्षकांनी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून प्रत्येक आठवड्याला आपल्या वर्गांची माहिती भरावयाची आहे. एकदा रजिस्ट्रेशन केल्यावर पुढील वेळेस केवळ रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांक व आपल्या पासवर्डसह प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी, रविवारी हे पोर्टलवर जावून माहिती भरावी. या पोर्टलवरून शिक्षकनिहाय, शाळानिहाय, केंद्रनिहाय, तालुकानिहाय, जिल्हानिहाय शिक्षकांचे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे