राज्‍यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण एकदमच वाटतेय भकास, काय आहे कारण 

toranmal tourist places
toranmal tourist places

शहादा : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ परिसरात घाट, वळणाचे रस्ते, बाजुला हिरवी गर्द झाडी, हिरव्या गवताचा गालीचा पांघरून डौलाने उभे आहे. डोंगर दऱ्यातून खळखळ वाहणारे निर्झर... हे तोरणमाळचे वैशिष्ट्य असून पर्यटकांना ते खुनावू लागले आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे सद्या हे पर्यटनस्‍थळ पर्यटकांविना सुनेसुने आहे. 

उत्तर महाराष्ट्रासह, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील पर्यटकांचा ओढा दरवर्षी तोरणमाळकडे असतो. यंदा कोरोना संकटामुळे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. समुद्रसपाटीपासून एक हजार ७६ मीटर उंचीवर असलेले, सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेतले तोरणमाळ हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. राज्यातील इतर पर्यटनस्थळापेक्षा सोईसुविधा तोकडी असली तरी येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहून टाकते. तोरणमाळला दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे येथील वर्षा पर्यटनाला पर्यटक मुकले आहेत. येथील निसर्ग पर्यटकांना खुणावत आहे. उगवता सूर्य व मावळत्या सुर्याची छबी कॅमेरात कैद करताना पर्यटकांची दरवर्षी झुंबड उडते परंतु हे सनसेट पॉईंट यंदा सुनेसुने दिसत आहे. 

स्थानिकाचा रोजगार गेला 
दरवर्षी वर्षा पर्यटनासाठी व निसर्ग सौंदर्याच्या मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्य व परराज्यातून पर्यटक हजेरी लावतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही काही काळ रोजगाराचे साधन उपलब्ध होते. त्यात विविध रानभाज्यांची मेजवानी पर्यटकांना चाखायला मिळते. अगदी आयुष्यात कधी पाहिली नसेल अशी रानभाजी पर्यटकांना येथे मिळते. शिवाय शरीराला पोषक व नाविन्यपूर्ण पदार्थ चाखायला भेटत असल्याने पर्यटकही तृप्त होतात. यंदा मात्र पर्यटक फिरकत नसल्याने स्थानिकांचा रोजगारही कोरोना ने हिरावून घेतला. 

गजबजलेले स्थळ सुनेसुने 
तोरणमाळला आल्यानंतर सीताखाई पॉईंट व फेसाळणारा धबधबा त्याच बरोबर यशवंत तलाव, कमल तलाव, बॉटनी गार्डन, मच्छिंद्रनाथांची गुहा हे गजबजलेले स्थळे यंदा मात्र सुनेसुने आहेत. आधी स्थळांवर पर्यटकांना मनसोक्त व स्वच्छंदी आनंद लुटता येतो. येथील प्रत्येक स्थळ हे निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने विशेष आनंद मिळतो. विशेष म्हणजे हॉटेल व्यवसायही पूर्णपणे बंद आहेत, त्यामुळे येथील नागरिकांचे रोजगाराचे साधन कोरोनाने हिरावून घेतले आहे. 

संपादन  ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com