८० रूपयांसाठी शिंदखेडा सोडून मध्यप्रदेशात युरीया विक्री

विजयसिंग गिरासे
Thursday, 30 July 2020

युरीया खतांचा पिशवी ही मध्य प्रदेशातील काही जण दोंडाईचा येथून चक्क ३५० रूपयाला घेवून जात असल्याने तालुक्यात युरीया खतांची टंचाई जानवू लागली आहे.

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात युरीया व १०:२६:२६ हे शेतोपयोगी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. मुळात तालुक्‍यात २७ हजार ८९१ मॅट्रीक टन युरीया खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. पण २६६ रूपयांची युरीया खतांचा पिशवी ही मध्य प्रदेशातील काही जण दोंडाईचा येथून चक्क ३५० रूपयाला घेवून जात असल्याने तालुक्यात युरीया खतांची टंचाई जानवू लागली आहे. 
शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाची सुरुवातीच्या अनियमित आगमनामुळे कापूस, बाजरी, बाजरी, मका, मूग आदी पिकांची दुबार पेरणी व लावणी केली. त्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला होता. परंतु श्रावण महिन्यात पावसाचे चांगले आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आणि मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताची मागणी होवू लागली. 

दुसरे खत घेण्यासाठी आग्रह
शिंदखेडा तालुक्यासाठी ३३ हजार ६७० मेट्रिक टन युरीयाची मागणी करण्यात आली असून आतापर्यंत २७ हजार ८९१ मॅट्रीक टन पुरवठा करण्यात आला आहे. लॉकडोऊनमुळे खताचा पुरवठा उशिराने झाला. तालुक्यातील खत विक्रेते त्यांच्याकडे युरिया, १०:२६:२६ व १५:१५:१५ रासायनिक खत असूनही देत नाही आणि द्यावयाचे असेल तर इतर शेतकऱ्यांना नको असलेली खते घेण्याचा आग्रह करताना आढळत आहेत. 

‘शिंदखेडा तालुक्याला आवश्यकता असलेल्या युरिया खतापैकी ८२.८४ टक्के व इतर रासायनिक खतांपैकी ८० टक्के खताचे वाटप केले आहे. जर एवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना खत वाटप झालेली आहेत; तरीही शेतकरी खतांची मागणी का करताना दिसून येत आहे. इतिहासात कधी ही एवढा रासायनिक खतांचा पुरवठा तालुक्याला करण्यात आला आहे. मागणी व पुरवठा यात साम्यता दिसून येत नाही. साठा असूनही जे विक्रेते खत देत नाही व इतर खत घेण्यासाठी आग्रह करत आहेत अशा विक्रेत्यांवर कारवाही केली जाईल.
- विनय बोरसे, तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा. 

खत विक्रेत्यांनी दुकानाबाहेर उपलब्ध असलेला साठा लिहिणे बंधनकारक करावे. शेतकरी चार- पाच दिवसांपासून शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन आपली कैफियत मांडत आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या खत विक्रेत्यानी खताची साठवण केली असेल त्यांच्यावर कडक कारवाही करण्यात यावी. 
उमेश चौधरी, शेतकरी, शिंदखेडा 

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पुरवठा (मॅट्रीक टनमध्ये)
तालुका - मागणी - झालेला पुरवठा 
धुळे -  ८,७५४ - ७,२६२
साक्री - १०,४३८ - ८,६४६
शिरपूर - ६,७३४ - ५,५७८
शिंदखेडा - ७,७४४ - ६,४१५ 

एकूण - ३३,६७० - २७,८९१
 
संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkheda taluka urea not avalable farmer and madhya pradesh state high rate sale