शिवसेनेच्या निवेदनाची दखल : ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरु होणार

निखील सुर्यवंशी
Monday, 26 October 2020

आर्थिक तंगीमुळे शेतकरी वर्ग सदर पिके मिळेल त्या भावाने विक्री करीत आहे. शेतकऱ्यांना आलेला उत्पादन खर्च बघता सदरील पिके विक्री केल्यानंतर मोठे नुकसान होत आहे.

शिंदखेडा  : तालुक्यातील कापूस, मका, ज्वारी हमीभाव खरेदी केंद्रे बंद असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी शासनाने कापूस, मका, ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी तालुका शिवसेनेतर्फे शिंदखेडा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्या निवेदनाची शासनाने दखल घेतली असून दि. १ नोव्हेंबर २०२० पासून कापूस, मका व ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु होणार आहेत. शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करावी, असे आवाहन शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख  हेमंत साळुंके यांनी केले आहे. 

शिंदखेडा तालुक्यात मागील हंगामात सी.सी.आय मार्फत कापुस खरेदी केंद्र व केंद्र शासनातर्फे मका, ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र सदरील खरेदी केंद्र हे बंद झाले असून चालू हंगामात शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापुस, मका, ज्वारी लागवड झाली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून कोविड परिस्थितीमुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे.

 

मागील वर्षी कापूस व मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरु असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु चालु वर्षाचा खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांनी कापूस वेचणी, मका, ज्वारी, बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक तंगीमुळे शेतकरी वर्ग सदर पिके मिळेल त्या भावाने विक्री करीत आहे. शेतकऱ्यांना आलेला उत्पादन खर्च बघता सदरील पिके विक्री केल्यानंतर मोठे नुकसान होत आहे. म्हणून केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ताबडतोब कापूस, मका, ज्वारी, हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी तालुका शिवसेनेने केली होती.

त्याची शासनाने दखल घेतली असून धुळे जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी धुळे यांच्यामार्फत ०४ व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक प्रादेशिक कार्यालय नंदुरबार यांचे मार्फत १ असे एकूण ५ खरेदी केंद्र  १ नोव्हेंबर २०२० पासून सुरु होणार आहेत. शेतकरी बांधवांनी हमीभाव खरेदी केंद्रावर नांव नोंदणी करुन आपला माल विकावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkhede According to Shiv Sena's statement, sorghum procurement will start from one November