५२ किलो गांजा जप्त..गव्हाच्या पोत्‍यांमध्ये दडवला होता माल 

सचिन पाटील
Friday, 24 July 2020

वाहने पोलिस ठाण्यात आणून पाहिल्यावर ५२ किलो सुक्या गांजाची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता. २३) सायंकाळी शहर पोलिसांनी दोन पिक-अपमधून ५२ किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी मुंबई व धुळे येथील चार संशयितांना अटक केली असून, साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

महामार्गावरून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलिसांनी शहादा फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. पिक-अप (एमएच ४८, बीएम ५४३२) व पिक-अप (एमएच ०४, ईबी ३६००)च्या तपासणीत गव्हाची पोती व रिकाम्या प्लॅस्टिक क्रेट्समध्ये दडवलेली गांजाची पोती आढळली. वाहने पोलिस ठाण्यात आणून पाहिल्यावर ५२ किलो सुक्या गांजाची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. वसई येथील पासिंग असलेल्या अशोक लेलँड पिक-अपचा चालक हसन उस्मान शेख (वय ४७, रा. गोरेगाव पश्चिम), सहचालक ताहेर मोहसीन अरब (१९, रा. नालासोपारा), महिंद्र पिक-अपचालक कपिलेश्वर लोहार (२०, रा. नगावबारी, धुळे), सहचालक संजय गोपाळ (रा. कदमबांडेनगर, धुळे) यांना अटक केली. मुंबईकडे गांजा वाहून नेत असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक सागर आहेर, हवालदार उमेश पाटील, पंकज पाटील, महेंद्र सपकाळ, नरेंद्र शिंदे, सनी सरदार, मुजाहिद शेख, प्रवीण गोसावी, योगेश कोळी यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur 52 kg of cannabis seized Police arrested four suspects