शिरपुरात साकारणार कृषी विद्यापीठ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस विद्यापीठामार्फत स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीमध्ये यूजीसी मान्यताप्राप्त बीएस्सी ॲग्रिकल्चर अभ्यासक्रम सुरू आहे.

शिरपूर : श्री विलेपार्ले केलवणी मंडळ, एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठ ऑफ कॅम्पस अशा सप्ततारांकित शैक्षणिक संकुलांनंतर माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर-चोपडा रस्त्यावर तरडी-बभळाज गावाजवळ ११५ एकरांवर कृषी विद्यापीठ साकारण्यात येणार आहे. 
एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस विद्यापीठामार्फत स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीमध्ये यूजीसी मान्यताप्राप्त बीएस्सी ॲग्रिकल्चर अभ्यासक्रम सुरू आहे. या महाविद्यालयाला राष्ट्रीय वैधानिक संस्था (आयसीएआर)कडून मान्यता मिळून ते राज्यातील कृषी विद्यापीठांना समकक्ष होईल. प्रस्तावित विद्यापीठासाठी ११५ एकर जमीन संपादित केली असून, भव्य कॅम्पसचा आराखडा तयार केला आहे. या कॅम्पसमध्ये अद्ययावत कृषी अभ्यासक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, तपासणी शाळा, कृषी मेळावे अशा सुविधा देण्यात येतील. पर्यावरण शिक्षण, अचूक शेती, कृषी व्यवसाय आधारित व्यवस्थापन, ॲग्री इंजिनिअरिंग, हार्टिकल्चर, सेंद्रिय शेती, बायोटेक्नॉलॉजी, पशुसंवर्धनशास्त्र, अन्नप्रक्रिया, हवामान आधारित शेती आदींबाबत अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 
 
शेती सर्वोत्तम व्यवसाय असून, त्यामार्फत फायदा होण्यासाठी सखोल तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी गुणवत्ताधारक तज्‍ज्ञ निर्माण व्हावेत, यासाठी कृषी विद्यापीठाचा प्रकल्प हाती घेतला आहे. संस्थेमार्फत अत्यंत दर्जेदार कृषी पदवी अभ्यासक्रम सुरू असून, त्याचा लाभ घ्यावा.  
-अमरिशभाई पटेल, माजी शिक्षणमंत्री 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur agriculture university devlopment amrishbhai patel