esakal | जळगावपाठोपाठ आता तरडीचाही बनाना पॅटर्न !
sakal

बोलून बातमी शोधा

Banana

जळगावपाठोपाठ आता तरडीचाही बनाना पॅटर्न !

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : भाजीपाल्यामुळे देशभरात प्रसिद्धी मिळविणाऱ्या पूर्व भागातील तरडी (ता. शिरपूर) येथील शेतकऱ्यांची केळी थेट युरोपात निर्यात करण्यात आली. जळगावपाठोपाठ केळी निर्यात करून तरडी गावाने शेतकऱ्यांसाठी रूढ केलेल्या बनाना पॅटर्नचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

हेही वाचा: धुळे जिल्ह्याला प्रतिदिन रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा १.२४ टक्के कोटा !

तरडी येथील जगन्नाथ उत्तमराव पाटील व पद्माकर जगन्नाथ पाटील यांची एकूण २० टन केळी युरोपसाठी रवाना करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून येथील शेतकरी केळीचे उत्पादन घेत आहेत. कंदापासून व रोपापासून येणाऱ्या केळी पिकाचे प्रयोग शेतकऱ्यांनी केले. उत्पादनात वाढ झाल्याने दर वर्षी केळीचे क्षेत्रही वाढले. त्यातून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची अघोषित स्पर्धाच सुरू झाली. उत्पादित मालाची गुणवत्ता पारखून घेण्याची सवयही या शेतकऱ्यांनी बाणवली. त्यातून केळीच्या गुणवत्तेची खात्री पटल्याने आपली केळी देशातच नव्हे, तर परदेशातही पोचावी या अपेक्षेने तरुण शेतकरी कामाला लागले. त्यातून पर्यायांचा शोध सुरू झाला. त्यात गेल्या सहा वर्षांपासून या भागातून शेतमाल खरेदी करणारे नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी सहकार्याची भूमिका घेतली. या कंपनीच्या तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांमुळे केळीचा दर्जा अधिक सुधारला. यंदा पीक काढणी सुरू झाल्यापासूनच केळी परदेशात पाठविण्याची तयारी सुरू झाली. गुणवत्ता, दर्जा व मागणी लक्षात घेऊन प्रारंभी बापूसाहेब शिवाजी पाटील यांची केळी इराणला पाठविण्यात आली. युरोपातून मागणी झाल्यानंतर मालाची तपासणी करण्यात आली. त्यात चार शेतकऱ्यांच्या केळीची निवड झाली. त्यापैकी जगन्नाथ पाटील व पद्माकर पाटील यांच्या शेतातील वीस टन केळी निर्यातीसाठी रवाना करण्यात आली.

हेही वाचा: जळगाव पॅटर्न नंदुरबारमध्ये; विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट, निगेटिव्ह नागरिकांना दंड

संघटनेतून प्रयत्न

केळी उत्पादन व विक्रीसाठी येथील शेतकऱ्यांनी केळी बागायतदार संघ स्थापन केला आहे. त्यात बापूसाहेब पाटील, पद्माकर पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, डॉ. हेमंत पाटील, कैलास पाटील, हिंमत पाटील, सुनील पाटील, पद्माकर योगराज पाटील आदींचा समावेश आहे.

हेही वाचा: राज्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

जैन टिश्यू कल्चरच्या अकरा हजार रोपांची लागवड केली आहे. सह्याद्री कंपनीने बाग निवडीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेत मार्गदर्शन केल्याने उत्तम गुणवत्तेची केळी पिकविणे शक्य झाले. सुरवातीचा माल इराणमध्ये निर्यात झाला आहे. गुणवत्तेप्रमाणे केळीला चांगला दरही मिळाला. बागेतून सुमारे २७० टन उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-पद्माकर पाटील, केळी उत्पादक

बाग निवडण्यापासून सह्याद्री कंपनीच्या गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादन प्रक्रियेला सुरवात होते. तज्ज्ञांमार्फत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यात येते. फ्रूटकेअर केल्यानंतर बड इंजेक्शन, फवारणी, फुले तोडणी, खते व पाणी व्यवस्थापन, फणी तोडणी, स्कर्टिंग बॅग चढविणे व या प्रत्येक टप्प्यावर टॅग बांधणे आदी कामे करून घेतली जातात.

-सचिन तिडके, सह्याद्री कंपनी

संपादन- भूषण श्रीखंडे