esakal | नाव तिचे करिना..जगावेगळी कौशल्‍ये आत्‍मसात; पण करिश्‍मा झाला उघड
sakal

बोलून बातमी शोधा

police arrest

आई- वडिलांनी करिना नाव ठेवले. बालपणापासून तिने अनेक जगावेगळी कौशल्ये आत्मसात केली. तारूण्यात प्रवेश करतानाच अनेक विद्या तिला अवगत झाल्या. पण शिरपूरमध्ये तिचा करिश्मा चालला नाही.

नाव तिचे करिना..जगावेगळी कौशल्‍ये आत्‍मसात; पण करिश्‍मा झाला उघड

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : तिचे गाव जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वजीरखेडे. आई- वडिलांनी करिना नाव ठेवले. बालपणापासून तिने अनेक जगावेगळी कौशल्ये आत्मसात केली. तारूण्यात प्रवेश करतानाच अनेक विद्या तिला अवगत झाल्या. पण शिरपूरमध्ये तिचा करिश्मा चालला नाही. तिने हस्तकौशल्याचा उपयोग करून चोरी केल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांनी तिला चतुर्भूज केले. येथील बसस्थानकात शनिवारी (ता.२) विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र अलगद कापून घेत पोबारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या करिना शिंदे (वय २०) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे चोरलेले मंगळसूत्रही आढळले. न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी मिळाली. 
प्रियंका धर्मराज पवार (वय २०, रा. कमखेडा, ता. शिंदखेडा) पतीसह शिरपूर बसस्थानकात जळगाव-अंकलेश्वर बसमध्ये चढत असतानाच त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जागेवर नसल्याचे आढळले. तिने आरडाओरड केल्यावर गर्दी जमली. पोलिसांना कळवताच निरीक्षक हेमंत पाटील यांनी तातडीने कर्मचारी रवाना केले. 

नखात होते धारदार पाते अन्‌
बसस्थानकात बंदोबस्तावरील हजर कर्मचाऱ्यांनीही संशयिताला हुडकण्यास सुरवात केली. एकाचवेळी पोलिसांनी धडक शोध सुरू केलेला पाहून २० वर्षीय युवतीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या संशयास्पद हालचाली आधीच हेरलेल्या महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यावरही तिने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे तिचा टिकाव लागला नाही. चोरलेले मंगळसूत्र तिने काढून दिले. संशयित करिना सराईत चोर असून, तिने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. नखात दडवलेल्या धारदार पात्याने मंगळसूत्राचा दोरा कापून चोरी करण्याची तिची पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
संपादन ः राजेश सोनवणे

loading image