तरुणाईतील उपद्रवमूल्याच्या वाढीला खतपाणी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

सोशल मीडियाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी या माध्यमांचा अधिकाधिक सकारात्मक आणि विधायक उपयोग कसा करता येईल, याकडे शासन, समाज आणि वापरकर्ते यांनी समन्वय साधून लक्ष देण्याची गरज आहे. बिकट प्रसंगांत सोशल मीडिया बंद करणे यासारखे उपायही योजावेत.

शिरपूरः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नवे दालन म्हणून उदयास आलेल्या आणि वापर करण्याच्या सुलभ यंत्रणेमुळे अल्पावधीतच जनमानस व्यापलेल्या "सोशल मीडिया'च्या अतिरेकामुळे युवा पिढीत अनेक मनोविकार वाढीस लागले आहेत. तरुणाईतील सुप्तावस्थेतील "उपद्रवमूल्या'च्या वाढीला खतपाणी घालणाऱ्या सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करण्यासाठी स्वनियंत्रण आणि मूल्याधिष्ठित आचारसंहिता अस्तित्वात न आल्यास परिस्थिती आणखी स्फोटक व नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती मानसोपचारतज्ज्ञ, विचारवंतांकडून व्यक्त झाली. 

एकटेपणात वाढ 
सोशल मीडियाद्वारे स्वतःला व्यक्त करण्याचे नवे आणि प्रभावी साधन गवसले खरे; पण त्याचे "साइड इफेक्‍ट्‌स' अधिक झाल्याचे वास्तव आहे. समवयस्क मित्र, कुटुंबीय, नातलगांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून "कनेक्‍ट' राहण्यावर भर दिला जातो. त्यामुळे केवळ औपचारिक बाबींची देवाणघेवाण होते. अडचणी, प्रश्‍न विचारण्यासाठी हे माध्यम वापरणे बहुतांश वापरकर्ते टाळतात. केवळ मनोरंजनासाठीच सोशल मीडिया अधिक वापरला जातो, हे उघड आहे. स्वमग्नता, एकलकोंडेपणा वाढीस लागून शेवटी वापरकर्ता एकटे राहणेच पसंत करतो. विशेषतः युवकांच्या बाबतीत ही समस्या प्रामुख्याने वाढीस लागली आहे. 

विचारशक्तीचा ऱ्हास 
सोशल मीडियावर अपवाद वगळता वरकरणी वैचारिक भासणाऱ्या "पोस्ट' प्रत्यक्षात विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या असतात. त्यावर साधकबाधक विचार न करता तशाच "फॉरवर्ड', "कॉपी- पेस्ट' होत असल्याचे दिसून येते. एखाद्या घटनेवर स्वतः विचार करून मत व्यक्त करणे दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे विध्वंसक, तेढ निर्माण करणाऱ्या "पोस्ट' सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रमाणावर प्रसिद्ध होऊन कायदा व सुव्यवस्थेला तडा जात असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधाने करणे धाडस मानले जाऊ लागले आहे. देशाचे भवितव्य हाती असलेल्या युवकांच्या विचारशक्तीचा हा ऱ्हास चिंताजनक आहे. 

मनोविकाराने नुकसान 
विचारशक्ती कमकुवत झाल्याने वैफल्य, नैराश्‍य आदी विकारांनी युवकांना ग्रासल्याची उदाहरणे मोठ्या संख्येने आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होताना संयम गमावणे, आक्रस्ताळेपणा, अर्वाच्य शब्दांचा बिनदिक्कत उच्चार, परिणामांचा विचार न करणे अशा वरकरणी साध्या दिसणाऱ्या अवगुणांतून मनोविकार वाढीस लागले आहेत. 

काय करायला हवे? 
सोशल मीडियाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी या माध्यमांचा अधिकाधिक सकारात्मक आणि विधायक उपयोग कसा करता येईल, याकडे शासन, समाज आणि वापरकर्ते यांनी समन्वय साधून लक्ष देण्याची गरज आहे. बिकट प्रसंगांत सोशल मीडिया बंद करणे यासारखे उपायही योजावेत. 

पालक- पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण होणे गरजेचे असून, युवकांमधील एकटेपणाची भावना निघाल्यास ते सोशल मीडियापासून काही प्रमाणात तरी दूर राहू शकतील. त्यांना वेळीच माध्यमाचा सदुपयोग, दुरुपयोग, संभाव्य धोक्‍यांची जाणीव करून द्यावी. "लॉक डाउन'मुळे संपूर्ण कुटुंब घरात आहे. यातून परस्पर संवाद आणि सामंजस्य वाढवण्याची मोठी संधी आहे. मुलांना चांगली पुस्तके वाचायला द्यावीत. वाईटातून चांगले कसे घडू शकेल, याचे चित्र पालकांनी मुलांसमोर उभे करावे. गरज भासल्यास समुपदेशकांचीही मदत घेता येईल. 
प्रा. वैशाली पाटील, मानसशास्त्र तज्ज्ञ, धुळे 

मैदानी खेळ, दमछाक करणारे व्यायाम आणि बौद्धिक क्षमता विकसित करणाऱ्या ग्रंथांचा सहवास ज्यांना लाभला त्यांनी सोशल मीडियाचा वापर केवळ निमित्ताने केला, याची अनेक उदाहरणे आहेत. गरज आहे ती कुटुंबप्रमुखाने घरात लक्ष देण्याची! आई, वडील सोशल मीडियात दंग असतील तर मुलांकडून कशी अपेक्षा करायची? मोबाईल हे साधन आहे, साध्य नव्हे याची जाणीव बालपणापासून मुलांना करून द्यावी. समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे काही तरी मानसिक आजार असावा अशा भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात. पालकत्व खंबीरपणे निभावावे. 
- प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, एसपीडीएम महाविद्यालय, शिरपूर 

कळत्या वयापासून मुलांची वैचारिक बैठक कशी ठाम होईल, याकडे शिक्षक आणि पालक या दोन्ही घटकांनी लक्ष द्यावे. त्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने ऐकणे, वाचन याला पर्याय नाही. समाजातील घडामोडींकडे डोळस भूमिकेतून पाहणे, त्यावर प्रतिक्रिया देण्याची सवय लावणे यातून वैचारिक विकास साधणे शक्‍य आहे. 
प्रा. शैलेंद्र सोनवणे, शिरपूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Shirpur corona logdown young boys