गुऱ्हाळपाणीला टेकडीवर भरते अनोखी डिजिटल शाळा 

सचिन पाटील
Thursday, 20 August 2020

गुऱ्हाळपाणी (ता. शिरपूर) येथील टेकडीवरच्या शाळेचा विषय सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने अध्ययन खंडीत झालेल्या गावांसाठी गुऱ्हाळपाणी आदर्श उदाहरण ठरले आहे.

शिरपूर : कोरोना पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले खरे, पण गावात मोबाईलला नेटवर्कच नसेल तर शिकायचे कसे, असा प्रश्न शिल्लक होता. आपल्यापर्यंत नेटवर्क येत नाही मग आपणच नेटवर्कच्या टप्प्यात का पोहचू नये असा विचार करून प्रयत्नांना सुरवात झाली. उपलब्ध नेटवर्कचा शोध सुरू झाला. गावाजवळच्या टेकडीवर झोपडी उभारली गेली आणि ऑनलाइन डिजिटल वर्गाला प्रारंभ झाला. 

गुऱ्हाळपाणी (ता. शिरपूर) येथील टेकडीवरच्या शाळेचा विषय सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने अध्ययन खंडीत झालेल्या गावांसाठी गुऱ्हाळपाणी आदर्श उदाहरण ठरले आहे. मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सातपुडा डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या या गावात कोणत्याच कंपनीचे मोबाईल नेटवर्क नाही. गावात चौथीपर्यंत वर्ग असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद झाली. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. पण मुळात नेटवर्क नसेल तर इंटरनेट चालणार कसे असा यक्षप्रश्न निर्माण झाला. ग्रामपंचायत सदस्य रजेसिंह पावरा व युवक मंडळींनी तोडगा शोधला. अखंड नेटवर्क उपलब्ध असलेल्या जागेचा शोध ते जवळच्या टेकडीवर पोहचले. तिथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश अशा दोन्ही राज्यातील मोबाईल नेटवर्क मिळत असल्याचे आढळले. इंटरनेट पुरेशा गतीने उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर लगेचच टेकडीवर कुडाची झोपडी तयार करण्यात आली. चटई, खुर्ची, पाण्याची सुविधा अशी जय्यत तयारी करून तिथे छोटेखानी अभ्यासिका साकारण्यात आली. प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करतात. विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन लाभते. हातात मोबाईल, वही, पुस्तक आणि पेन घेऊन उत्साहाने टेकडीची वाट चढणारे विद्यार्थी परिसरासाठी जिद्द आणि स्वावलंबनाचे प्रतिक ठरले आहेत. धुळे येथील यंग फाउंडेशनने अभ्यासिकेला भेट दिली असून डिजिटल वर्गासाठी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक नेमणार असल्याची माहिती संदीप देवरे यांनी दिली. 

गावाची परंपरा 
संपूर्ण आदिवासी असलेल्या गुऱ्हाळपाणी गावाला जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परंपरा लाभली आहे. येथील मजूर कुटुंबातील डॉ. जगदीश पावरा मुंबई येथे रेडिओलॉजीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. गावातील तीन विद्यार्थी एमबीबीएस करीत आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माण अशा विविध विद्याशाखेत गावचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

अडचणींवर रडत बसण्याऐवजी मार्ग शोधायला हवा. सर्वांच्या सहकार्यातून या पर्यायी डिजिटल क्लासरूमची निर्मिती शक्य झाली. ‘केजी टू पीजी’ विद्यार्थी मोबाईलद्वारे ऑनलाइन शिकताहेत. हे पाहून समाधान वाटते. 
प्रा. रमेश पावरा, मार्गदर्शक 

संपादन  : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur digital school On the hill