esakal | उमेद कोणी संपवू शकत नाही; एकेक कार्यकर्ता नव्याने जोडणार : एकनाथ खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

बहुजनांच्या बळावर भाजपला सत्ता मिळाली म्हणून बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, असे मत व्यक्त केले आणि माझ्या छळाला सुरवात झाली. खानदेशातील मुक्ताईनगर, बोदवड उपसा सिंचन प्रकल्पासह सर्वच सिंचन प्रकल्प रखडवण्यात आले.

उमेद कोणी संपवू शकत नाही; एकेक कार्यकर्ता नव्याने जोडणार : एकनाथ खडसे

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : आमदारपद, मंत्रिपद ही दुय्यम बाब आहे. माझ्यासाठी उत्तर महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांना खानदेशातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करा, हेच साकडे घातले. एकेक कार्यकर्ता नव्याने जोडून राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्यासह खानदेशचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. 
येथील मनोमिलन लॉन्समध्ये शनिवारी (ता. ३१) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे अध्यक्षस्थानी होते. महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, डॉ. उत्तमराव महाजन, डॉ. जितेंद्र ठाकूर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, डिगंबर माळी, ललित वारूडे, तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, दिनेश मोरे, युवक राकाँचे तालुकाध्यक्ष आशिष अहिरे, शहराध्यक्ष युवराज राजपूत, चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील, डॉ. मनोज महाजन, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण महाजन, नीलेश गरुड, सत्यवती पावरा, लीलाचंद लोणारी, नितीन निकम आदी उपस्थित होते. 
खडसे म्हणाले, की बहुजनांच्या बळावर भाजपला सत्ता मिळाली म्हणून बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, असे मत व्यक्त केले आणि माझ्या छळाला सुरवात झाली. खानदेशातील मुक्ताईनगर, बोदवड उपसा सिंचन प्रकल्पासह सर्वच सिंचन प्रकल्प रखडवण्यात आले. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला वाळीत टाकले गेले. सूड उगवण्याच्या नादात माझ्यावर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत खालची पातळी गाठली. 

साथ सोडून गेले 
धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित, दोंडाईचाचे रावल कुटुंब यांना भाजपमध्ये मी आणले, उमेदवारी मिळवून दिली. माझ्याविरोधात कारवाया सुरू होताच ते सोयीस्करपणे दूर निघून गेले. हरकत नाही, नवे नेतृत्व तयार करण्याची माझी उमेद कोणीही संपवू शकत नाही. माझ्या श्वासात खानदेश आहे. विधानसभेतील पहिल्या भाषणापासून ते अखेरपर्यंत मी केवळ विकासाबाबत आग्रही भूमिका घेतली, यापुढेही ती सोडणार नाही, असे खडसे यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

महिनाभरात मोठा गौप्यस्फोट 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भाजप आता व्यापारी व दलालांचा पक्ष झाल्याची टीका केली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच एकनाथ खडसे पक्षात आले असते, तर भाजपचे ६० पेक्षा कमीच आमदार निवडले गेले असते. माझ्या पराभवासाठी दोन कोटी रुपये प्रतिस्पर्धी उमेदवाराला भाजपच्याच नेत्यांनी दिले. महिनाभर वाट बघा, एकाला उघडे पाडेन आणि जेलमध्ये पाठवेल, असा इशारा श्री. गोटे यांनी दिला. पुढच्या विधानसभा निवडणुकीची तयारी मी माझ्या पद्धतीने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 
रमेश करंकाळ यांनी प्रास्ताविकात शिरपूर साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खडसे यांच्याकडे केली. डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी खडसेंसह प्रत्येक निष्ठावंतावर भाजपमध्ये अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली. डॉ. महाजन यांनी खडसेंच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सांगितले. ज्योती पावरा यांनी खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळाल्याचे नमूद केले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतर पक्षातील अनेकजण पक्षप्रवेशासाठी इच्छुक असून, त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. राहुल साळुंखे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

त्यांना कार्यकर्ते कसे कळतील 
खडसेंच्या जाण्याने भाजपला काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार गिरीश महाजन यांनी दिली. त्याबाबत विचारल्यावर खडसे म्हणाले, की एकेका कार्यकर्त्याने पक्ष मोठा होतो. प्रत्येकाचे स्वतंत्र महत्त्व असते. पण काहींना ते कळत नाही. कुणाचे, किती, कसे, कुठे नुकसान होईल हे येणाऱ्या काळातच दिसेलच. मी कृतीने बोलून उत्तर देणारा माणूस आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे