शेतात लागवड केलेला ५९० किलो गांजा जप्त 

सचिन पाटील
Monday, 19 October 2020

तूर आणि कपाशीच्या पिकाआड त्याने गांजा लागवड केल्याचे आढळले. पाच ते आठ फुटांपर्यंत उंच असलेली गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. त्यांचे वजन २९० किलो भरले.

शिरपूर (धुळे) : बोराडी (ता. शिरपूर) येथील दोन शेतांमध्ये लागवड केलेली सुमारे सहा क्विंटल गांजाची झाडे सांगवी पोलिसांनी रविवारी (ता. १८) जप्त केली. फरारी झालेल्या दोन संशयितांना अटक करण्यात आली. 
बोराडी परिसरातील एकलव्यपाडा परिसरात शेतात गांजा पेरल्याची माहिती सांगवीचे सहाय्यक निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यांनी माहितीची खातरजमा करून एकलव्यपाडा येथील डोंगरसिंह खजान पावरा याच्या शेतात छापा टाकला. तूर आणि कपाशीच्या पिकाआड त्याने गांजा लागवड केल्याचे आढळले. पाच ते आठ फुटांपर्यंत उंच असलेली गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. त्यांचे वजन २९० किलो भरले. या मुद्देमालाची किंमत दोन लाख ९० हजार रुपये आहे. परिसराची बारकाईने तपासणी करीत असताना, पोलिसांना डोंगरसिंहच्या शेतालगत गब्बरसिंह फिरंग्या पावरा याच्या शेतातही तूर व कपाशीच्या आड गांजा लावल्याचे दिसले. तेथे कारवाई करून पोलिसांनी ३०० किलो वजनाची व तीन लाख रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली.

सहा लाखाचा माल 
पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागल्याने दोन्ही संशयित फरारी होण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांनी चोरट्या विक्रीच्या उद्देशाने गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत एकूण पाच लाख ९० हजार रुपयांचा ५९० किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक खैरनार, दीपक वारे, हवालदार लक्ष्मण गवळी, संजीव जाधव, संजय धनगर, प्रेमसिंह गिरासे, पवन गवळी, भूषण चौधरी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, श्यामसिंह पावरा, आरिफ पठाण, रामदास बारेला, गिते, श्रीमती अश्विनी चौधरी यांनी केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur farm 590 kg of cannabis planted in the field seized