esakal | शिरपूर येथे साकारणार पहिले योग महाविद्यालय !
sakal

बोलून बातमी शोधा

शिरपूर येथे साकारणार पहिले योग महाविद्यालय !

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर योगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता या क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी आहेत.

शिरपूर येथे साकारणार पहिले योग महाविद्यालय !

sakal_logo
By
सचिन पाटील

 
शिरपूर : येथील योगविद्या धाम संस्थेला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे योग महाविद्यालय सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे ते खानदेशातील पहिलेच स्वतंत्र महाविद्यालय असणार आहे. 

शहर आणि तालुक्यात योगविद्या धामतर्फे १८ वर्षांपासून योगशिक्षण दिले जात आहे. आरोग्य व योगाबाबत जनजागृती करण्यासाठी व्याख्याने, योगवर्ग, कार्यशाळा सुरू असतात. पाच वर्षांपासून संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा योगशिक्षक हा पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. त्यापूर्वी उमविचा योगशिक्षक अभ्यासक्रम संस्थेने सलग तीन वर्षे राबविला. आतापर्यंत संस्थेमार्फत सुमारे ५०० योगशिक्षक प्रशिक्षित केले असून, हजारो योगसाधक सध्या ऑनलाइन वर्गांद्वारेही प्रशिक्षण घेत आहेत.

संस्थाध्यक्ष तथा माजी मंत्री अमरीशभाई पटेल, धुळे येथील योगतज्ज्ञ गं. ग. बारचे, प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, आर. सी. पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन संस्थेला लाभते. या शैक्षणिक वर्षापासून एम.ए. (योगशास्त्र) अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात होत असून, प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष डॉ. श्रीकांत वाडिले, डॉ. वर्षा वाडिले यांनी केले. 

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर योगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता या क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी आहेत. योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण व प्रशिक्षण घेऊन योगशिक्षकाची नोकरी वा योग वर्गाच्या माध्यमातून निश्‍चित स्वरूपाचा स्वयंरोजगार मिळवता येणे शक्य आहे. या अभ्यासक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. 
-डॉ. श्रीकांत वाडिले, कार्याध्यक्ष, योगविद्या धाम  

संपादन- भूषण श्रीखंडे