esakal | २० लाखांचा गांजा जप्त; लागवड झालेल्या जमिनी घेणार ताब्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

hemp seal

‘गांजाची सीमेपलीकडून रिमोट शेती; पोलिसांसाठी आव्हान’ हा वृत्तलेख प्रकाशित करून गांजाची लागवड रोखण्यासाठी वनविभाग व महसूल विभागाचे सहकार्य आवश्यक असल्याची मागणी केली होती. त्यानंतर या तिन्ही विभागांनी संयुक्त कारवाई केली. 

२० लाखांचा गांजा जप्त; लागवड झालेल्या जमिनी घेणार ताब्यात 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : तालुक्यातील गांजा लागवडीचा प्रश्न गांभीर्याने घेत विविध शासकीय विभागांनी समन्वयाने २६ नोव्हेंबरला केलेल्या कारवाईत तब्बल साडेसात क्विंटल गांजा जप्त केला. वनविभाग, पोलिस आणि महसूलचे मनुष्यबळ पाहून परिसरातील ग्रामस्थही आश्चर्यचकित झाले. दरम्यान गांजाची लागवड झालेल्या वनजमिनी पुन्हा ताब्यात घेऊन संशयितांचे वनपट्टे रद्द करणार असल्याचे वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. दैनिक ‘सकाळ’मधून २३ नोव्हेंबरला ‘गांजाची सीमेपलीकडून रिमोट शेती; पोलिसांसाठी आव्हान’ हा वृत्तलेख प्रकाशित करून गांजाची लागवड रोखण्यासाठी वनविभाग व महसूल विभागाचे सहकार्य आवश्यक असल्याची मागणी केली होती. त्यानंतर या तिन्ही विभागांनी संयुक्त कारवाई केली. 

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, धुळे ग्रामीणचे साक्री स्थित उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, तहसीलदार आबा महाजन, सहायक वनरक्षक अमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सांगवीचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, थाळनेरचे सहायक निरीक्षक सचिन साळुंके यांच्यासह दहा पोलिस अधिकारी, ६५ पोलिस कर्मचारी, तीन नायब तहसीलदार, १३ मंडलाधिकारी व तलाठी, सांगवी वनपरिक्षेत्राचे क्षेत्रीय अधिकारी मेश्राम, १० वनपाल व वनरक्षक यांची वेगवेगळी चार पथके तयार करुन संशयित क्षेत्रातील वनजमीन व महसूलच्या अखत्यारीतील जमिनीची तपासणी करण्यात आली. 
शोधमोहिमेत तालुक्यातील चिलारे व लाकड्या हनुमान शिवारात वनजमिनीवर अनुक्रमे रतनसिंग पाडवी आणि राहुजा नाना पाडवी यांनी गांजाची लागवड केल्याचे आढळले. रतनसिंग पाडवी याच्या शेतातून तब्बल सहा क्विंटल पाच किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत १२ लाख १० हजार आहे. राहुजा पाडवी याच्या शेतात वाळत घातलेला एक क्विंटल ६३ किलो सुका गांजा आढळला असून त्याची किंमत आठ लाख १५ हजार रूपये आहे. कारवाईची चाहूल लागल्याने दोन्ही संशयित फरारी झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, सहायक वनसंरक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

वनजमिनी करणार जप्त 
यापूर्वी झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये अतिक्रमित वनजमिनींवर गांजाची लागवड झाल्याचे उघडकीस आले होते. २६ नोव्हेंबरलाही तोच प्रकार आढळला. त्यामुळे गांजा लागवड झालेल्या वनजमिनी जप्त करून वनविभाग पुन्हा ताब्यात घेणार आहे. संबंधित शेतकऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. यापूर्वी केलेल्या कारवाईतील वनजमिनीचा तपशीलही वनविभाग तपासून कार्यवाही करणार असल्याची माहिती देण्यात आली. 

महसूल सक्रिय 
महसूल क्षेत्रातील जमिनीवर कोणत्या पिकाची लागवड केली आहे. याची खात्री संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी जागेवर जाऊन करावी, तशी योग्य नोंद करावी. नोंद व प्रत्यक्ष लागवड केलेल्या पिकात तफावत आढळल्यास संबंधितांवर कारवाईची पावले उचलली जातील असे महसूल विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image