चमत्‍कार..साडेचारशे फुट कूपनलिका दहा वर्षांपासून होती बंद; अचानक पाणी ओव्हारफ्लो  

सचिन पाटील
Tuesday, 29 September 2020

करवंद प्रकल्पातच शहराला पाणीपुरवठा करणारा उद्भव असून गाळ साठल्याने तेथील जलपातळीही खालावली होती. पटेल बंधूंनी पालिकेच्या अभियंत्यांसह जलतज्ज्ञांशी चर्चा करून गाळ काढण्याचे नियोजन केले.

शिरपूर (धुळे) : काही महिन्यांपूर्वी शेतात पिकांना पाणी कुठून द्यावे या समस्येने बेजार झालेल्या करवंद (ता.शिरपूर) येथील शेतकऱ्यांना त्यांच्या ४५० फूट खोल कूपनलिकेतील पाणी प्रचंड दाबाने उसळी घेऊन बाहेर पडत असल्याचे अनोखे दृश्य पहायला मिळाले. 

करवंद मध्यम प्रकल्पातून गाळ काढण्याचे बहुप्रतिक्षित काम माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी पालिकेच्या माध्यमातून मार्गी लावले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवेंद्र पाटील, सरपंच श्रीमती मनीषा पाटील व शेतकऱ्यांनी याकामी अमरिशभाईंना साकडे घातले होते. करवंद प्रकल्पातच शहराला पाणीपुरवठा करणारा उद्भव असून गाळ साठल्याने तेथील जलपातळीही खालावली होती. पटेल बंधूंनी पालिकेच्या अभियंत्यांसह जलतज्ज्ञांशी चर्चा करून गाळ काढण्याचे नियोजन केले. यंदाच्या उन्हाळ्यात पालिकेतर्फे उद्भवासाठी नवीन विहीर बांधण्यासह गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी सर्व यंत्रसामग्री व कामगार उपलब्ध करून दिले. प्रकल्पातील सुपीक गाळ शेतकऱ्यांना देण्यात आला. शेकडो ट्रॅक्टर्स याकामी कार्यरत होते. मे अखेरीस गाळ काढण्याचे काम संपले. 

करवंदच्या सांडव्यावरून पाणी 
यंदा मुबलक पाऊस झाल्याने करवंद प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. उद्भव क्षेत्रातही मोठा पाणीसाठा झाला. गाळ काढल्याने जलपारेषणाचे क्षेत्र विस्तारले. त्यामुळे दहा वर्षापासून बंद पडलेल्या करवंद, कण्हेरीपाडा ते थेट दहिवद क्षेत्रातील कूपनलिका जिवंत झाल्या. त्यातही नदीकाठच्या क्षेत्रातील कूपनलिकांतून प्रचंड दाबामुळे भूगर्भातील पाणी बाहेर ओसंडू लागले. हे वाहणारे पाणी टाकावे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. अखेरीस पुन्हा अरुणावती नदीकडे हे पाणी वळवण्यासाठी छोट्या चाऱ्या तयार करणे भाग पडले. 
 
निसर्गाचा चमत्कार 
मानवी प्रयत्नांना निसर्गाने दिलेल्या साथीमुळे झालेला हा चमत्कार पाहण्यासाठी भूपेशभाई पटेल, तपन पटेल, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे, भालेराव माळी, आनंदसिंह राऊळ, जय माळी, भूपेंद्र गुजर, सुनील जैन, वनाधिकारी नितीन बोरकर, शेतकरी भगवान वाणी, सत्तार जमादार, लोटन पाटील, संदीप पाटील, अजय पावरा आदी उपस्थित होते. 
 
करवंद प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. तिचा संपूर्ण अभ्यास करून सुरुवातीला उद्भव क्षेत्रातील गाळ काढण्याचे नियोजन केले. त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आलेत. शेतकऱ्यांसाठी काही करू शकलो याचे समाधान आहे. तालुक्यातील अन्य प्रकल्पातील गाळ काढण्याबाबतही नियोजन सुरू आहे. 

- भूपेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष, शिरपूर 
 
 
बारा वर्षापूर्वी कूपनलिका तयार केली. सुरुवातीचे वर्षभर बऱ्यापैकी तर नंतर कसेबसे पाणी मिळाले. तिची खोली 450 फुटापर्यंत नेली. मात्र नऊ वर्षापासून ती कोरडीठाक होती. अरुणावती नदीतील गाळ काढल्यामुळे खूप फायदा झाला. पावसाळ्यात तर चार फुटापर्यंत पाणी बाहेर उसळत होते. 
- सत्तार जमादार, शेतकरी, करवंद 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur four and a half feet coupon line water overflow after ten year