esakal | दोन व्यापाऱ्यांंनी कांदा उत्पादकांची २४ लाखांत केली फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

दोन व्यापाऱ्यांंनी कांदा उत्पादकांची २४ लाखांत केली फसवणूक 

शेतकऱ्यांचे घेणे असलेल्या २४ लाख ५० हजार २२२ रुपयांच्या परताव्यासाठी दोघांनी टाळाटाळ केली. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर त्यांनी धनादेश दिले.

दोन व्यापाऱ्यांंनी कांदा उत्पादकांची २४ लाखांत केली फसवणूक 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : घाऊक कांदा खरेदी करून पैसे देण्यास वर्षभरापासून टाळाटाळ करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात शेतकऱ्याने तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दोघांनी तऱ्हाडी (ता. शिरपूर) परिसरातील शेतकऱ्यांची २४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

आवश्य वाचा- कृषी विधेयक विरोध ट्रॅक्टर रॅलीसाठी राहुल गांधींना आमंत्रण


तऱ्हाडी येथील २० कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गावातील व्यापारी अनिल भामरे याने २०१८-१९ मध्ये लासूर (ता. चोपडा) येथील गोपाल माळी हा मोठा व्यापारी असल्याचे सांगून करोडो रुपयांचा व्यवहार असल्याने त्याच्याकडे कांदा विकण्यासाठी देण्याचा आग्रह धरला. गोपाल माळी यानेही शेतकऱ्यांची भेट घेऊन रोखीने खरेदीचे आश्वासन दिले. दोघांनी मिळून संबंधित शेतकऱ्यांकडून चार हजार १९८ क्विंटल कांदा विकत घेतला. या व्यवहारापोटी काही रक्कम आगाऊ देऊन उर्वरित रक्कम दहा दिवसांत देतो, असे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांचे घेणे असलेल्या २४ लाख ५० हजार २२२ रुपयांच्या परताव्यासाठी दोघांनी टाळाटाळ केली. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर त्यांनी धनादेश दिले. मात्र, ते अनादर होऊन परत आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा पैशांची विचारणा केल्यानंतर व्यापाऱ्यांनी ‘तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, आम्ही पैसे देणार नाहीत’, अशी धमकी दिली. संबंधितांनी फसवणूक केल्याची खात्री झाल्याने शेतकरी सुभाष भामरे, अरुण भामरे, निंबा भामरे, वामन भामरे, निंबा सोनवणे, नथा पाटील, संजय भामरे, कांतीलाल लोहार, युवराज भामरे, लक्ष्मण पाटील, प्रकाश भामरे, ज्ञानेश्वर पाटील, सुदाम सोनवणे यांच्यातर्फे बाजीराव भामरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयित व्यापारी अनिल भामरे व गोपाल माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

संपादन- भूषण श्रीखंडे