भावाचे कर्तव्य पार पाडणाऱया फडणवीसांना…व्याधीमुक्त युवतीने बांधली राखी 

सचिन पाटील 
Tuesday, 4 August 2020

तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली. सोबतच पंतप्रधान निधीसाठी पाठपुरावा करून तीन लाख रूपयांची मदतही मिळवून दिली.

शिरपूर : ‘दुर्धर आजारातून माझी मुक्तता करुन तुम्ही भावाचे कर्तव्य आधीच पार पाडले. आता राखी बांधून मला माझे कर्तव्य करु द्या’ म्हणत गरताड (ता.शिरपूर) येथील शीतल देविदास अहिरे या युवतीने माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. ओळखदेख नसतांना केलेल्या मदतीचा ऋणनिर्देश करणाऱ्या भगिनीच्या भावना जाणून श्री फडणवीसही गहिवरले. ‘तुझे संपूर्ण आयुष्य निरोगी राहो’ अशा शुभेच्छांची ओवाळणी त्यांनी घातली.

येथील एसव्हीकेएम संकुलाच्या भूमिपूजनासाठी सोमवारी (ता.3) शिरपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांची शीतल अहिरे हिने माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या ‘जनक व्हिला’ या निवासस्थानी भेट घेवून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. अत्यंत सामान्य कुटुंबातील शीतलच्या श्रवण यंत्रणेत गंभीर स्वरूपाची विकृती होती. त्यावरील शस्त्रक्रियेसाठी सहा लाख रूपयांची गरज होती. येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी 2016 मध्ये शीतलच्या परिस्थितीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली. सोबतच पंतप्रधान निधीसाठी पाठपुरावा करून तीन लाख रूपयांची मदतही मिळवून दिली. मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शीतलवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाल्याने शीतलने त्यांना भेटण्याचा हट्ट धरला. मात्र केवळ निवडक निमंत्रकांच्या उपस्थितीत अत्यंत खाजगी स्वरुपाचा कार्यक्रम असल्यामुळे तिला परवानगी मिळत नव्हती. तिने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, सरचिटणीस अरुण धोबी यांच्याकडे फडणवीसांच्या भेटीची इच्छा प्रदर्शित केली. उभयतांनी अमरीशभाई पटेल यांच्याशी चर्चा करुन तिला परवानगी मिळवून दिली. रक्षाबंधनाचा योग असल्याने तिने श्री फडणवीस यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी उपस्थितांनी तिला मिळालेल्या मदतीबद्दल फडणवीस यांना माहिती दिली. ‘अशा लाखो माताभगिनींचे आशीर्वाद मिळवू शकलो याची कृतार्थता वाटते’ अशी शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shirpur gratitude of a disease free girl by tying rakhi to Devendra Fadnavis