esakal | उद्धवजी, स्थलांतरितांच्या प्रश्‍नात तत्काळ हस्तक्षेप करा- मेधा पाटकर
sakal

बोलून बातमी शोधा

megha patkar

उत्तरप्रदेशच्या सीमेवर दोन लाख स्थलांतरित मजूर अडकल्याचे कारण देत महाराष्ट्राकडून येणाऱ्या मजुरांना मध्यप्रदेश प्रशासनाने शिरपूरजवळ बिजासनी घाटात थोपवून धरले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती पाटकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना या प्रश्‍नी वैयक्तिक लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

उद्धवजी, स्थलांतरितांच्या प्रश्‍नात तत्काळ हस्तक्षेप करा- मेधा पाटकर

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : महिनाभर चालून आल्यानंतर स्थलांतरीतांना परत जाण्याचा आदेश दिला जातो, हा काय प्रकार आहे ? उद्धवजी, आपण तत्काळ हस्तक्षेप करून स्थलांतरितांना न्याय मिळवून द्या अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशच्या सीमेवर दोन लाख स्थलांतरित मजूर अडकल्याचे कारण देत महाराष्ट्राकडून येणाऱ्या मजुरांना मध्यप्रदेश प्रशासनाने शिरपूरजवळ बिजासनी घाटात थोपवून धरले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती पाटकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना या प्रश्‍नी वैयक्तिक लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

मजुरांना थांबवा
राज्य सीमेवरील पेचप्रसंग कायमचा सुटेपर्यंत उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहारकडे परत जाणाऱ्या मजुरांना राज्यातच थांबवा, त्यांच्यासाठी धान्याची सोय करा, त्यांच्या वाहतुकीसाठी जादा रेल्वे सोडा, या रेल्वे सरळ भोपाळला न सोडता त्यांना सामावून घेण्यासाठी मुंबई, नाशिक, खंडवा, भोपाळ असे थांबे द्यावेत, मजुरांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घ्यावी अशी मागणी श्रीमती पाटकर यांनी केली आहे.

मजुरांसाठी उपोषण
दरम्यान, मुंबईसह विविध भागातून महामार्गाद्वारे उत्तर भारतात पायी जाणाऱ्या मजुरांना मध्यप्रदेशात प्रवेश द्यावा, त्यांना वाहनांची व आर्थिक मदत करून इच्छित स्थळी पोहचवावे आदी मागण्यांसाठी श्रीमती पाटकर पाटकर, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एम. डी. चौबे यांनी मंगळवार (ता.4) पासून ठिकरी (मध्यप्रदेश) येथील सेगवल फाट्यावर उपोषण सुरु केले आहे. त्यानंतर बडवानी प्रशासनाने नरमाई दाखवत स्थलांतरित मजुरांच्या काही वाहनांना प्रवेश दिला. मात्र बिजासनी घाटात मुंबई, गुजराथसह विविध भागातून येणाऱ्या उत्तर भारतीय मजुरांच्या वाहनांचा ओघ कायम आहे.