esakal | रेंज नाही म्‍हणून डोंगरमाथ्‍यावरील झोपडीला केले परिक्षा केंद्र; तिथे भावंड देताय विद्यापीठाचा पेपर
sakal

बोलून बातमी शोधा

university exam

गुऱ्हाळपाणी (ता. शिरपूर) या दुर्गम भागातील शिवानी पावरा व गणेश पावरा हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत बोराडी (ता.शिरपूर) येथील कर्मवीर व्यं. ता. रणधीर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शिवानी पावरा विज्ञान तर गणेश कला शाखेच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत आहे. 

रेंज नाही म्‍हणून डोंगरमाथ्‍यावरील झोपडीला केले परिक्षा केंद्र; तिथे भावंड देताय विद्यापीठाचा पेपर

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : परीक्षेचा डोंगर पार केला की पदवी मिळणार..पण ऑनलाईन परीक्षा द्यायची म्हटली; तर गावात मोबाईलला रेंज नाही. तिथे इंटरनेट कसे उपलब्ध होणार? मग विद्यार्थ्यांनी चक्क डोंगर जवळ केला. पुरेशी रेंज मिळणाऱ्या डोंगरमाथ्यावर झोपडी बांधली. तिथे जाऊन हे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 

गुऱ्हाळपाणी (ता. शिरपूर) या दुर्गम भागातील शिवानी पावरा व गणेश पावरा हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत बोराडी (ता.शिरपूर) येथील कर्मवीर व्यं. ता. रणधीर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शिवानी पावरा विज्ञान तर गणेश कला शाखेच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत आहे. 

झोपडीला केले परिक्षा केंद्र
अद्याप दळणवळण सुरळीत न झाल्याने तसेच कोरोना साथसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला. मात्र गुऱ्हाळपाणी गावात मोबाईलला रेंज नसल्याची प्रमुख अडचण उभी राहिली. रेंजचा शोध घेत दोघांच्या कुटुंबियांनी डोंगरमाथ्यावर धाव घेतली. यापूर्वी ऑनलाईन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांनी त्यांना योग्य जागा निवडण्यास मदत केली. झोपडी बांधून परीक्षा केंद्र तयार करण्यात आले. दोघे विद्यार्थी नियोजित वेळेत परीक्षा देत आहेत. 

सौरउर्जेवर मोबाईल चार्ज
गावात विजेची समस्याही आहे. त्यामुळे सोलर पॅनलद्वारे मोबाईल चार्ज करून ठेवण्याची काळजी दोघेही घेतात. त्यांच्या धडपडीला महाविद्यालयाचे प्राचार्य डी. बी. पाटील, उपप्राचार्य एल. यू. पावरा, प्रा. दशरथ पावरा यांचे सहकार्य लाभले. 

ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला. पण अँड्रॉइड मोबाईल नव्हता. भावाने त्याचा मोबाईल उपलब्ध करून दिला. गावात मोबाईल रेंज नसल्याने डोंगर माथ्यावर जाऊन पेपर देत आहे. परीक्षेचा हा अनुभव अविस्मरणीय असणार आहे.
- शिवानी पावरा, परीक्षार्थी

प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्जनाची आकांक्षा अधिकच वाढल्याचे उदाहरण म्हणजे गुऱ्हाळपाणी गाव म्हणता येईल. येथील डॉ. जगदीश पावरा मुंबई येथे एम.एस. (रेडिओलॉजी) करीत असून तीन विद्यार्थी एमबीबीएस करीत आहेत. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, ऍग्रीकल्चर, फार्मसीचे शिक्षण घेत आहे. आपल्यानंतरची पिढी उच्चविद्याविभूषित व्हावी यासाठी गावातील कुटुंब प्रमुखांची धडपड विशेष उल्लेखनीय आहे. 
- प्रा.रमेश पावरा, न्यू बोराडी ता.शिरपूर

संपादन ः राजेश सोनवणे