esakal | सिनेस्टाईल बंदूक हातात घेवून युवकाने काढला फोटो; याच फोटोमूळे झाला गजाआड !
sakal

बोलून बातमी शोधा

सिनेस्टाईल बंदूक हातात घेवून युवकाने काढला फोटो; याच फोटोमूळे झाला गजाआड !

कर्नाटक राज्यात घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याचा मोबाईल तपासताना देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) हाती घेतलेल्या युवकाचे छायाचित्र आढळले.

सिनेस्टाईल बंदूक हातात घेवून युवकाने काढला फोटो; याच फोटोमूळे झाला गजाआड !

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : हातात पिस्तूल घेऊन सिनेस्टाईल छायाचित्र काढण्याचा छंद युवकाला गजाआड घेऊन गेला. दुचाकी, मोबाईल, पिस्तूल आणि काडतुसे असा मुद्देमाल जप्त करून सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयित आंतरराज्य स्तरावरील गुन्ह्यांत सहभागी असल्याची शक्यता तपासण्यात येत आहे. 

आवश्य वाचा- शेतातून अचानक बिबट्या आला समोर; आणि शेतकरी सैरावैरा पळाले ! 
 

कर्नाटक-जोयदा कनेक्शन 
कर्नाटक राज्यात घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याचा मोबाईल तपासताना देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) हाती घेतलेल्या युवकाचे छायाचित्र आढळले. संशयिताने छायाचित्रातील युवकाचे नाव रोहित असून तो महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात राहत असल्याची माहिती दिली. कर्नाटक पोलिसांनी धुळे येथे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना त्याबाबत सूचित केले. श्री पंडित यांनी सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांना कारवाईचे निर्देश दिले. 

रोहित निघाला अरुण 
अभिषेक पाटील यांनी संशयिताचा शोध घेतला. छायाचित्राआधारे ओळख पटवल्यावर संशयिताचे नाव अरुण रावजी पावरा (वय १९, रा. जोयदा ता. शिरपूर) असल्याचे निष्पन्न झाले. एक नोव्हेंबरला रात्री आठला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या बजाज पल्सर दुचाकी (एमपी ४६ एमएल ७२७७) च्या सीटखाली देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळली. या मुद्देमालाची एकूण किंमत ७२ हजार ४०० रुपये आहे. संशयिताच्या मोबाईलमध्येही त्याचे पिस्तूलासोबतचे छायाचित्र आढळले. त्याचे कर्नाटक कनेक्शन पोलिस तपासत आहेत. अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दीपक वारे, हवालदार लक्ष्मण गवळी, संजय जाधव, योगेश दाभाडे, योगेश मोरे, श्याम पावरा, गोविंद कोळी, रामदास बारेला यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे