ग्राहक कायद्याचा वापर करत विद्यार्थ्याने मिळविली फी 

सचिन पाटील
Friday, 9 October 2020

गुरुकुल संगीत विद्यालयाचे माहितीपत्रक वाचून जानेवारी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. विद्यालयाचे संचालक डॉ. नितीन शास्त्री यांनी त्यांना प्रारंभी शास्त्रीय गायन शिकण्याचा सल्ला दिला.

शिरपूर (धुळे) : माहितीपत्रकानुसार सुविधा नसल्याने संगीत विद्यालयाकडे फी परत मागणाऱ्या विद्यार्थ्याला दीड वर्ष सातत्याने पाठपुरावा करावा लागला. ग्राहक कायद्यान्वये लढा देऊन त्याने विद्यालयाकडून संपूर्ण फी परत मिळविली. 
येथील ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते राकेश मोरे यांच्याबाबत हा प्रकार घडला. त्यांनी शहरातील निनाद फाउंडेशन संचलित गुरुकुल संगीत विद्यालयाचे माहितीपत्रक वाचून जानेवारी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. विद्यालयाचे संचालक डॉ. नितीन शास्त्री यांनी त्यांना प्रारंभी शास्त्रीय गायन शिकण्याचा सल्ला दिला. त्यापोटी पाच हजार रुपये घेऊन प्रवेश अर्ज भरून घेतला. महिनाभरानंतर मोरे यांनी गायनाऐवजी बासरीवादनाचा वर्ग लावला. 

म्‍हणून मागितली फी परत
शिकताना त्यांना माहितीपत्रकानुसार सेवा, सुविधा व प्रशिक्षण दिले जात नसल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षण बंद करून भरलेल्या फीमधील साडेतीन हजार रुपये सामोपचाराने द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, संचालक शास्त्री यांनी नकार दिला. त्यामुळे मोरे यांनी ग्राहक कायदा, माहिती अधिकार कायद्याचा वापर करून विविध संस्थांकडून गुरुकुल संगीत विद्यालयाची अधिकृत माहिती घेतली. या माहितीसह ग्राहक कायद्यान्वये मोरे यांनी गुरुकुल संगीत विद्यालयाकडे फी परत मागण्यासाठी पत्रव्यवहार केला. अखेर दीड वर्षाने संबंधित विद्यालयाने त्यांना पाच हजार रुपये धनादेशाद्वारे परत केले. 

फसव्या जाहिरातींपासून सावध राहा, जाहिरात पत्रकानुसार सेवा-सुविधा मिळत नसल्यास विद्यार्थ्याला फी परत मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी ग्राहकांनी दिलेल्या रकमेची पक्की पावती जपून ठेवावी व ग्राहक कायद्यानुसार पाठपुरावा करावा. 
-राकेश मोरे, ग्राहक 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur rakesh more return fee music class on customer law