निवृत्‍तीनंतरही गुन्‍ह्याची कागदपत्रे ठेवली स्‍वतःजवळ

सचिन पाटील
Monday, 23 November 2020

तपासकामी दिलेले आकस्मिक मृत्यू, अपघात, फसवणूक आदी वेगवेगळे गुन्हे त्यांनी प्रलंबित ठेवले. त्यांची कागदपत्रे स्वतःजवळ ठेवून घेतली.

शिरपूर (धुळे) : निवृत्तीनंतरही गुन्ह्यांची कागदपत्रे स्वतःजवळ बाळगून संशयितांना शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून निवृत्त पोलिस अधिकाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिस ठाण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा आहे. चिंधू चंदू सोनवणे (रा. जांभोरा, ता.साक्री) असे संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. शिरपूर पोलिस ठाण्यातून सहायक उपनिरीक्षक पदावरून सोनवणे निवृत्त झाले. त्यांच्याकडे तपासकामी दिलेले आकस्मिक मृत्यू, अपघात, फसवणूक आदी वेगवेगळे गुन्हे त्यांनी प्रलंबित ठेवले. त्यांची कागदपत्रे स्वतःजवळ ठेवून घेतली. मुदतीत कागदपत्रे हजर करून गुन्ह्यांच्या तपासाचा निपटारा केला नाही. 

आदेशानंतरही नाही दिले
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी कागदपत्रे पोलिस ठाण्यात सोपवली नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, गुन्ह्यांमधील संशयितांना शिक्षेपासून वाचवण्याच्या हेतूने कागदपत्रे गहाळ करणे आदी आरोपांन्वये त्यांच्याविरोधात हवालदार उदय पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक उपनिरीक्षक एन.बी.सोनवणे तपास करीत आहेत. 
 
दुसऱ्या लग्नासाठी महिलेचा सासरकडून छळ 
शिरपूर : दुसऱ्या लग्नासाठी पत्नीचा छळ केल्याच्या संशयावरून पतीसह तिघांविरोधात सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनिता किशोर पावरा (वय ३८, रा.उमर्दा, हमु बोमल्यापाडा ता.शिरपूर) या विवाहितेच्या फिर्यादीनुसार, तिला घरकाम येत नाही, ती आवडत नाही त्यामुळे दुसरे लग्न करावयाचे आहे. तसेच माहेरून ५० हजार आणावेत अशा मागणीसाठी संशयित पती किशोर वळवी, सासू मोगरीबाई वळवी, जेठाणी कालीबाई वळवी (सर्व रा.उमर्दा ता.शिरपूर) यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. जोवर पैसे मिळणार नाहीत, तोवर तिला सासरी घेऊन जाणार नाही असे सांगून तिला माहेरी राहणे भाग पाडले. हवालदार हेमंत पाटील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur retired police officer case document no return