esakal | शिक्षकांचे दातृत्व..कोविड सेंटरला दिले १८ ऑक्सिजन सिलिंडरची भेट

बोलून बातमी शोधा

oxigen
शिक्षकांचे दातृत्व..कोविड सेंटरला दिले १८ ऑक्सिजन सिलिंडरची भेट
sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील प्राथमिक शिक्षकांनी निधी संकलन करून शिंगावे (ता. शिरपूर) येथील शासकीय कोविड सेंटरला एकूण १८ जम्‍बो ऑक्सिजन सिलिंडरची भेट दिली.

प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी शिक्षकांची भेट स्वीकारून आभार मानले. कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्याने शासकीय रुग्णालये आणि कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडरची मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याबाबत गटविकास अधिकारी युवराज शिंदे, गटशिक्षणाधिकारी एस. सी. पवार शिरपूर पंचायत समितींतर्गत शिक्षकांशी चर्चा केली. कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपण्याची शपथ घेऊन शिक्षक कामाला लागले. अवघ्या दोन दिवसांत सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी निधी संकलन करून १३ जम्बो सिलिंडरची खरेदी केली. सावित्रीच्या लेकी या महिला शिक्षकांच्या समूहाने तीन सिलिंडर दिली. शिक्षण विस्ताराधिकारी डॉ. नीता सोनवणे यांनी त्यांच्या नणंदेच्या स्मरणार्थ एक, तर पळासनेर (ता. शिरपूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक सिलिंडर भेट दिले. एकूण १८ सिलिंडर एकत्र झाल्यानंतर शिंगावे येथील कोविड सेंटरला पोचविली.

प्रशासनातर्फे प्रांताधिकारी बांदल यांनी शिक्षकांची भेट स्वीकारली. ते म्हणाले, की आपत्तीकाळात सामाजिक जबाबदारीचे भान राखून शिक्षकांनी मोठा आदर्श घालून दिला आहे. कोरोनाविरोधात लढाईत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामपातळीवर शिक्षकांचा मोठा प्रभाव असतो. त्याचा उपयोग करून ग्रामीण व आदिवासी भागात लसीकरणाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांतर्फे शरद सूर्यवंशी यांनी प्रशासनाला कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निधी संकलनासाठी भगवंत बोरसे, नगराम जाधव, दत्तू पाटील, नंदकिशोर पाटील, उमाकांत गुरव, छोटू राजपूत, संदीप पवार, संतोष जाधव, गिरीश गांगुर्डे, संजय पवार, जितेंद्र राजपूत, वसंत कोळी, रत्नाकर सोनवणे, ज्ञानेश्वर डोळे, उपेंद्र पाटील, पांडुरंग पाटील, रा. का. पाटील, मनोहर शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश सोनवणे, संदीप घुमाडे, भरत चौधरी, कौशल्य भारती, दीपक पाटील, अभिमन पाटील यांचे सहकार्य लाभले.

संपादन- भूषण श्रीखंडे