वेदनादायी ः "कोरोना'बाधित मृताच्या पत्नीचा 70 किमी पायी प्रवास! 

सचिन पाटील
Wednesday, 27 May 2020

पैसे नसल्यामुळे ती  सकाळी नऊला पायीच धुळ्याहून भाटपुऱ्याकडे निघाली. सायंकाळी सहाला शिरपूर- चोपडा रस्त्यावरील प्रियदर्शिनी सूतगिरणीजवळ ती पायी जाताना नातेवाईकांना दिसली.

 शिरपूर ः धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ व बेजबाबदार कारभार टोकाला पोहोचल्याचा पुर्नप्रत्यय आणून देणारी घटना मंगळवारी (ता. 26) घडली. भाटपुरा (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील मृत "कोरोना'बाधित रुग्णाची 43 वर्षीय पत्नी व "हाय रिस्क कॉंटॅक्‍ट' म्हणून घोषित ही महिला उपाशीतापाशी, भर 44 डिग्री सेल्सियस चटके देणाऱ्या उन्हात 70 किलोमीटर अंतर पायी चालत गावाकडे परताना आढळली. तिला गावात प्रवेशापूर्वीच ग्रामस्थांनी रोखून धरले. शेवटी वैद्यकिय व पोलिस यंत्रणेने तिला शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन केले. विशेष म्हणजे सायंकाळी साडेपाचपर्यंत या घटनेची कर्तव्यदक्ष कुठल्याही अधिकाऱ्याला कानभून लागली नाही. 

हिरे महाविद्यालय ते भाटपुरापर्यंत 70 किलोमीटर अंतर संबंधित गरीब महिलेने उपाशीतापाशी राहून सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पार केले. या वेदनादायी प्रकारामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त झाला. धक्कादायक बाब म्हणजे 22 मेपासून वैद्यकीय महाविद्यालयात जाऊनही तिचा "स्वॅब' घेण्याची औपचारिकताही तेथील यंत्रणेने पाळली नाही. आता तिचे "स्वॅब' तपासणीसाठी धुळ्याला पाठविण्यात येणार आहेत. 

काय आहे प्रकरण? 
भाटपुरा येथील 48 वर्षीय व्यक्तीला "कोरोना' झाल्याचा अहवाल 22 मेस प्राप्त झाला. संबंधित "रुग्ण' त्यावेळी घरी होता. त्याच्या संपर्कातील 20 जणांना "हाय रिस्क कॉंटॅक्‍ट' म्हणून जाहीर करत 19 जणांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्याच्या पत्नीला पतीसोबत रुग्णवाहिकेने धुळे येथे रवाना केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ यांनी महिलेसोबत "ट्रान्सफर मेमो' देताना संबंधित महिला "हाय रिस्क कॉंटॅक्‍ट' असून तिलाही दाखल करून "स्वॅब' घ्यावेत, असे पत्र दिले होते. 

धुळ्यात महिला वाऱ्यावर 
संबंधित रुग्णाला 22 मेस दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या पत्नीचा "स्वॅब'ही घेतला नाही किंवा तिला दाखलही करून घेतले नाही. तिच्या पतीचा सोमवारी मृत्यू झाला. रात्री उशिरा धुळे येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, तरीही महाविद्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना जाग आली नाही. त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केले. काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून त्या निरक्षर महिलेने एका अधिकाऱ्याला "मला घरी जायचे आहे' असे सांगितले. त्याने काहीच दखल न घेता तिला जाण्यास सांगितले. पैसे नसल्यामुळे ती सकाळी नऊला पायीच धुळ्याहून भाटपुऱ्याकडे निघाली. सायंकाळी सहाला शिरपूर- चोपडा रस्त्यावरील प्रियदर्शिनी सूतगिरणीजवळ ती पायी जाताना नातेवाईकांना दिसली. याबाबत सरपंच शैलेंद्र चौधरी यांना सूचित करण्यात आले. त्यांनी माहिती दिल्यावर तहसीलदार आबा महाजन, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, थाळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे तेथे पोहोचले. 

भाटपुरा ग्रामस्थांचा संताप 
हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे संबंधित महिलेची परवड झाल्याबद्दल ग्रामस्थांमधून संताप व्यक्त झाला. पतीवियोगाच्या दुसऱ्याच दिवशी तिला 70 किलोमीटरचे अंतर पायी चालून यावे लागते, ही बाब जिल्हा व आरोग्य प्रशासनासाठी शरमेची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सरपंच चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. तहसीलदार महाजन, सहाय्यक निरीक्षक साळुंखे यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर संबंधित महिलेस रुग्णवाहिकेतून येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तिचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल 
या प्रकाराची जिल्हाधिकारी संजय यादव यांनी गंभीर दखल घेतली. प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांना घटनेचा सविस्तर अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश त्यांनी दिला. बुधवारी (ता. 27) प्रांताधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देतील. 22 मेस धुळे येथे पोहोचल्यावर महाविद्यालयाच्या रजिस्टरमध्ये संबंधित महिलेच्या नावाची नोंदही चुकीची करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई होते किंवा नाही, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpure 70 km trek of the wife of the corona's victim!