सोसायटीतील एखाद्या-दुसऱ्याच्या उपद्रवमूल्यामुळे 50 हजार सदनिकाधारकांना झळ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 June 2019

नाशिक ः शहर आणि जिल्ह्यातील पाच हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सोसायटीतील एखाद्या-दुसऱ्याच्या उपद्रव्यमूल्याची झळ 50 हजार सदनिकाधारकांना सहन करावी लागत आहे. देखभाल-दुरुस्ती, हस्तांतरण अन्‌ ना वापर शुल्क संघर्षाला कारणीभूत ठरत असल्याने स्वच्छता, पाणीपुरवठा, लिफ्ट दुरुस्ती यावर परिणाम होत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, सोसायट्यांमधील सलोख्याला गालबोट लागत आहे. 

नाशिक ः शहर आणि जिल्ह्यातील पाच हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सोसायटीतील एखाद्या-दुसऱ्याच्या उपद्रव्यमूल्याची झळ 50 हजार सदनिकाधारकांना सहन करावी लागत आहे. देखभाल-दुरुस्ती, हस्तांतरण अन्‌ ना वापर शुल्क संघर्षाला कारणीभूत ठरत असल्याने स्वच्छता, पाणीपुरवठा, लिफ्ट दुरुस्ती यावर परिणाम होत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, सोसायट्यांमधील सलोख्याला गालबोट लागत आहे. 

    देखभाल-दुरुस्तीचा खर्च किती असावा? खर्च ठरविण्याचा अधिकार सोसायटीला असला तरीही तो सर्वांना समान का असू नये? निवासी असो की व्यावसायिक? पहिल्या मजल्यावर राहता की शेवटच्या? सदनिकेचा आकार कमी की अधिक? यावर हा खर्च कसा अवलंबून राहणार? हे कमी काय म्हणून पहिल्या मजल्यावर राहतो म्हटल्यावर लिफ्टचा वापर न करता आम्हाला त्याची झळ का बसवायची, हे प्रश्‍न देखभाल-दुरुस्तीचा खर्च आकारणीवरून वादाला कारणीभूत ठरत आहेत.

एका सोसायटीत एखाद्याच्या मालकीच्या दोन सदनिका असलेले मालक एका सदनिकेचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च देऊ, अशी भूमिका घेतात. सोसायट्यांमधील वादाची कारणे शोधण्यासाठी शहराच्या विविध भागांत फेरफटका मारल्यावर काही जण वर्षानुवर्षे सदनिका बंद राहत असल्याने दरमहा खर्च का द्यायचा, अशी भूमिका घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. हे कमी की काय म्हणून भाड्याने दिलेल्या सदनिकाधारकांना ना वापर शुल्क म्हणजेच देखभाल खर्च द्यावा लागतो. याही शुल्क आकारणीतून सोसायटीमधील रहिवाशांना वादाला सामोरे जावे लागते. वादातून शुल्क मोठ्या प्रमाणात थकत असल्याने सोसायटीच्या देखभाल-दुरुस्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. काही सोसायट्यांमधील लिफ्ट बंद पडल्या. चेंबर, गटार दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत. 

सोसायटीधारक हतबल 
मनमानीविरुद्ध कायद्याचा बडगा वापरायचा म्हटल्यावर उपद्रवी सभासद वेठीला धरत वाद चिघळविण्यात धन्यता मानता असल्याने सोसायटीधारक हतबल होत असल्याची अनेक उदाहरणे शहराच्या विविध भागांत पाहायला मिळतात. मुळातच, विरोध होताच, चर्चेची गुऱ्हाळे सुरू होतात. प्रत्येक बैठकीला सर्व जण उपस्थित राहतील, असे एकीकडे घडत असताना ज्याच्याविषयी वाद आहे, असा सभासद बैठकींना दांडी मारतो. त्यातून सुविधांचा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करू लागल्यावर संबंधित सभासदाविरुद्ध ठराव करून सक्षम यंत्रणेकडे पाठविला जातो खरे, मग कायदेशीर प्रक्रियेचा ससेमिरा सुरू होतो आणि प्रश्‍नांच्या धगीमध्ये कुटुंबीयांना दैनंदिन दिवस काढावा लागतो. 

मनस्तापामागील कारणे 
0 एका कुटुंबात आठ ते दहा सदस्य असल्यावर दैनंदिन पाण्याच्या वापरावरून होते भांडण. 
0 मांसाहारी कुटुंबीयांचा त्रास होतो ही शाकाहारी कुटुंबांची तक्रार कायमचीच. 
0 सोसायटीत विशिष्ट कुटुंबीयांच्या प्रतिबंधाचा धरला जाणारा आग्रह. 
0 वादानंतर चढावी लागणारी पोलिस ठाण्याची पायरी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news society problem