esakal | शाळेचा अभ्‍यास नाही मग विद्यार्थी रंगले कीर्तनात 
sakal

बोलून बातमी शोधा

kirtan

गावापासून लांब, वेगळे व एकांतात राहत असल्याने व बाहेरच्यांना तेथे प्रवेश नसल्याने ‘कोरोना’पासून विद्यार्थ्यांचा बचाव होतो. हंगामात मिळालेल्या धान्य व देणगीतून तर कधी माधुकरी मागून आश्रमातील सर्वांचे भरण पोषण होते. 

शाळेचा अभ्‍यास नाही मग विद्यार्थी रंगले कीर्तनात 

sakal_logo
By
लोटन चौधरी

सोनगीर (धुळे) : ‘शाळा बंद; पण अभ्यास सुरू’ ही संकल्पना सर्वत्र राबविली जात असून, त्यातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत निकुंभे परिसरातील विद्यार्थी कीर्तनात रंगले आहेत. कीर्तनाबरोबरच पखवाज, तबला, मृदंग, पेटी, वीणा आदी वाजवण्याचे धडे घेत आहेत. 
सर्वच विद्यार्थी पाचवी ते आठवी दरम्यान असून, घरची गरिबी नसली तरी मुलांना अध्यात्माचे ज्ञान मिळावे म्हणून पालकांनी त्यांना आश्रमात पाठविले आहे. त्यांना कीर्तन व वाजंत्रीचे प्रशिक्षण मोफत मिळत असून लवकरच तरबेज होऊन बालकीर्तनकार म्हणून ते बाहेर पडतील. गावापासून लांब, वेगळे व एकांतात राहत असल्याने व बाहेरच्यांना तेथे प्रवेश नसल्याने ‘कोरोना’पासून विद्यार्थ्यांचा बचाव होतो. हंगामात मिळालेल्या धान्य व देणगीतून तर कधी माधुकरी मागून आश्रमातील सर्वांचे भरण पोषण होते. 

शेतात भरविला आश्रम 
निकुंभे येथील फाट्यावर शेतात आश्रम उभारला असून विठ्ठल-रखुमाई, तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर आदी संतांच्या मूर्ती आहेत. आश्रमात वास्तुरचनेनुसार शोभिवंत फुले, पूजनीय झाडे, वेली आहेत. परिसरातील खेड्यातील अनेक विद्यार्थी ‘कोरोना’काळात येथे राहत असून ऑनलाइन अभ्यास झाल्यावर रोज या आश्रमात विद्यार्थ्यांकडून आध्यात्मिक धडे गिरवून घेतात. अध्यापनाचे काम ह.भ.प इंद्रसिंग महाराज राजपूत करतात. 

दरवर्षी हरिनाम कीर्तन सप्ताह 
निकुंभे, बोरीस, वडणे, बुरझड व परिसरातील विद्यार्थी येथे असून दररोज गायन, वादन, हरिपाठ, कीर्तन, भजन, काकडारती यात रंगून जात, भजनात ताल धरून नाचताना देहभान विसरून भक्तीत मग्न होत आहेत. आश्रमासाठी दोन एकर जमीन निकुंभे येथील शेतकरी भास्कर भटा पाटील यांनी मोफत दिली आहे. दरवर्षी हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन होते. आळंदी येथील नामवंत कीर्तनकारांना आमंत्रित केले जाते. 

संपादन ः राजेश सोनवणे