चांगल्‍या पावसामुळे जामखेली, कनोली, मुकटी प्रकल्प तुडुंब 

लोटन चौधरी
Tuesday, 18 August 2020

४७ लघुप्रकल्पांत ७५ टक्क्यांहून जास्त साठा आहे. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरणात ८० टक्के साठा आहे.

सोनगीर (ता. धुळे)  ः गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात सध्या ६३.२९ टक्के साठा असून, यंदा पाणीसाठ्याची ही स्थिती चांगली म्हणावी लागेल. परिणामी यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही अशी स्थिती आहे. जामखेली, कनोली, मुकटी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. 

धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४.८६ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सध्या त्यात ३१३.१८८ दशलक्ष घनमीटर एवढा साठा आहे. लघुप्रकल्पाची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्ष घनमीटर असून, सध्या त्यात ९७.८५४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८०.२३ टक्के साठा आहे. 

मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ३७२.८९ दशलक्ष घनमीटर असून, सध्या २१५.३३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५७.७५ टक्के साठा आहे. धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्पांत २३ टक्क्यांपेक्षा जास्त साठा असून, तीन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सर्वांत कमी २३.२४ टक्के म्हणजे १५.१२ दशलक्ष घनमीटर साठा सुलवाडे प्रकल्पात आहे. जामखेली, कनोली, मुकटी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील ४७ लघुप्रकल्पांत ७५ टक्क्यांहून जास्त साठा आहे. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरणात ८० टक्के साठा आहे. यंदाच्या या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील. कोरोना, वादळाने त्रस्त जनतेला पाणीटंचाईने ग्रासले नाही हे भाग्यच म्हणावे लागेल. दरम्यान, गेल्या २० वर्षांत जामफळव्यतिरिक्त एकाही लघुप्रकल्पाचा विस्तार केला गेला नाही. किमान अक्कलपाडा धरणाचा विस्तार आवश्यक आहे. 

प्रकल्प जलसाठा (दलघमी) टक्के 
१) पांझरा - २८. ०४, ७८.७० 
२) मालनगाव - ११.३२८, ९९.९८ 
३) जामखेडी - १२.३४, १०० 
४) कनोली - ८.४५, १०० 
५) बुराई - १४.२, ९९.९३ 
६) करवंद - १५.७८, ८६.४० 
७) अनेर - १९.९७, ४०.५३ 
८) सोनवद - १२.०४, ८३. ८४ 
९) अक्कलपाडा - ३७.९६, ४२.७४ 
१०) वाडीशेवाडी - ३१.३३, ९२.३९ 
११) अमरावती - ८.७८, ४१.३२ 
१२) सुलवाडे - १५.१२, २३.२४ 
एकूण लघुप्रकल्पात - ९७.८५४, ८०.२३ 
एकूण मध्यम प्रकल्पात - २१५.३३४, ५७.७५ 
जिल्ह्यातील साठा - ३१३.१८८, ६३.२९ 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songir dhule district good rains three dam is full swing