खानदेशातील रद्द यात्रांमुळे एक हजार कोटींचे नुकसान  

एल. बी. चौधरी
Saturday, 28 November 2020

खानदेशात सुमारे पन्नास मोठ्या यात्रा भरतात. त्यातून अब्जावधी रूपये उलाढाल होवून खानदेशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो.यात्रा भरणाऱ्या गावांना लाखो रुपये महसूल व तरूणांना रोजगार मिळतो.

सोनगीर ः खानदेशात पावसाळा वगळता आठ महिने कुठेना कुठे लहान मोठ्या यात्रा भरतात. कार्तिकी एकादशीनंतर प्रमुख यात्रांना सुरूवात होते. केवळ यात्राहेच उदरनिर्वाहाचे साधन असलेले खानदेशातील लाखाहून अधिक लहानमोठे व्यावसायिक आहेत. खानदेशच नव्हे तर राज्याच्या अर्थकारणावर यात्रांचा मोठा प्रभाव आहे. यात्रा म्हणजे एक पर्वणीच असून समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्वाचा घटक आहे. यंदा हिवाळ्यातील सर्व यात्रांवर कोरोनाचे सावट असल्याने यात्रा रद्द झाल्या असून सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 

आवर्जून वाचा- मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने किमान 3 जणांना तरी मारलं असतं

गुढीपाडवानंतर उन्हाळी विशेेषतः देवींच्या यात्रा सुरू होतील की नाही शंकाच आहे. खानदेशात विखरण, सारंगखेडा, आमळी, बोरीस, मंदाणे, शिरपूर, मुडावद, बहादरपूर, अमळनेर, धुळे, चोरवड, वायपूर आदि ठिकाणच्या यात्रा प्रसिध्द आहेत. याशिवाय नवरात्र व चैत्र महिन्यातील नवरात्रात देवींच्या यात्रा भरतात. खानदेशात एकविरादेवी, पेडकाईदेवी, मनुदेवी, बिजासनीदेवी, धनदाई देवी, इंदाशी देवी, धनाई-पुनाई देवी, आशापुरीदेवी, भटाई देवी आदि देवींच्या यात्राही प्रसिध्द आहेत.

यात्रा हेच जीवन
लाखाहून अधिक व्यावसायिक केवळ यात्रावर पोट भरतात. त्यांचा अन्यत्र कुठेही स्थिर व्यवसाय नाही. त्यात सर्व प्रकारचे पाळणे, मौत का कुवा सारखे विविध करमणूकीची साधने, काही लोकनाट्य मंडळे, गोंदणकला, लहान मोठे गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने एवढेच नव्हे काही उपहारगृहे चालकही केवळ यात्रेतच व्यवसाय करतात. केवळ एका यात्रेपुरता व्यवसाय करणारेही अनेक आहेत. इतरवेळी शिक्षण किंवा मजुरी करणारे काही युवक नारळ, फूलमाळा, शेंगदाणे, फुटाणे व अन्य लहान मोठे व्यवसाय करून आपल्या पुढील भवितव्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवतात.

यात्रेमुळे गावाचीही प्रगती
एका यात्रेतून कोट्यावधी रूपयाची उलाढाल होते. खानदेशात सुमारे पन्नास मोठ्या यात्रा भरतात. त्यातून अब्जावधी रूपये उलाढाल होवून खानदेशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो.यात्रा भरणाऱ्या गावांना लाखो रुपये महसूल व तरूणांना रोजगार मिळतो.त्यातून त्या गावाचाही विकास होत आहे.यात्रेतील भाविकांच्या देणगीतून भव्य मंदिर, रोषणाई, रस्ते, पिण्याचे पाणी, निवास व जेवण व्यवस्था, स्वच्छतागृह, शौचालय आदि सुविधा झाल्या आहेत. यासंदर्भात मनुदेवी, पेडकाईदेवी मंदिराचे उदाहरण देता येईल. त्यामुळे पुर्वीसारखे यात्रेकरूंचे हाल न होता यात्रा सुखाच्या झाल्या आहेत.

वाचा- व्याप‍ाऱ्यांनी धोरणात बदल केला आणि शिरपूरचा कापूस गुजरातमध्ये
 

कलवांतावर बेरोजगाराची कुऱ्हाड

खानदेशातील यात्रा म्हणजे आनंदाचा वाहता झराच असतोो. यंदा कोरोनामुळे यात्रांवर बंदी आल्याने यात्रेतील व्यावसायिकांनाा मोठा फटका बसला असून एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात्रेवर पोट असणाऱ्या फुगेवालापासून तमाशा कलावंतांपर्यंत देशोधडीला लागले आहेत. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली असून कुटुंबियांचे पालन पोषण कसे करावे हा प्रश्न आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songir one thousand crore loss due to canceled yatras in Khandesh