खोक्‍यावर झाडू भरलेल्या गोण्या; त्‍याखाली होते वीस लाखाचे घबाळ

wine transport
wine transport

सोनगीर (धुळे) : सोनगीर - दोंडाईचा राज्यमार्गावर येथील पोलिसांनी सुमारे २० लाख रुपये किमतींची दारू आयशर ट्रकमधून अवैधरित्या गुजरात राज्यात नेताना काल गुरुवारी (ता. १) मध्यरात्री पकडली. आयशरमध्ये दारूच्या खोक्यांवर झाडू भरलेल्या गोण्या ठेवलेल्या आढळून आल्या. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

धुळ्याकडून सोनगीर मार्गाने दोंडाईचाकडे एका आयशर वाहनात दारू घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांना मिळाली. पोलिसांनी सोनगीर फाट्यापासून दीड किलोमीटर अंतरावर दोंडाईचा मार्गावरील धनश्री हॉटेलजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास सापळा रचला. थोड्याच वेळात आयशर ट्रक (एमएच १८ बीजी १९०५) येताना दिसले. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता गाडीत झाडूने भरलेल्या गोण्या आढळून आल्या. तेव्हा मिळालेली माहिती खोटी होती की काय अशी शंका उपस्थित झाली. 

बिलाची मागणी करताच उडाली भंबेरी
ट्रक सोडून देण्यापुर्वी पोलिसांनी चालकाकडून झाडूचे बिल दाखविण्याची मागणी केली. तेव्हा उडवाउडवीची उत्तर मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी कसून विचारपूस व तपासणी करताच झाडूच्या गोण्या खाली दारूने भरलेले बॉक्स मिळून आले. ट्रक पोलिस ठाण्यात नेण्यात येऊन संशयित मुकेश वरदु जयस्वाल (वय २७, राहणार संयोग नगर, गांधी पॅलेस इंदूर, मध्यप्रदेश) तसेच फारुख जफार शेख (वय २०, राहणार काकड सागर पॅलेस इंदूर, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे दारू विक्री अथवा वाहतुकीचा कोणताच परवाना नसल्याचे दिसून आले. ही दारू भिवंडी येथून भरून अहमदाबाद येथे नेला जात असून दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जप्त केलेल्या दारूची किंमत दीव - दमण येथे कर नसल्याने आठ लाख ४२ हजार रुपये असून महाराष्ट्रात मात्र २० लाख १६ हजार रुपये आहे. व्हिस्की, वोडका, सिग्नेचर, स्कॉच, बियर आदी उच्च दर्जाची दारू व आयशर मुद्दे जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक एन. एम. सहारे, पोलिस नाईक शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम आदींनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक एन. एम. सहारे तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com