#Motivational: संघर्षावर मात करत ज्योतीताईची स्वेटरनिर्मिती, देशभर नवी ओळख

विजयकुमार इंगळे
शनिवार, 21 डिसेंबर 2019

नाशिक-जगण्याच्या लढाईत वादळं यायलाच हवीत. त्याशिवाय आपली क्षमता कळत नाही. तद्वतच आयुष्याच्या वाटचालीत कुटुंब सावरतानाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक महिला धडपडत असतात. हीच धडपड यशस्वी करत स्वेटर व्यवसायातून स्वतःला सिद्ध करण्याबरोबरच इतरांसाठी आदर्श ठरलेल्या महिलांपैकी एक नाव म्हणजे ज्योती रानडे. 

नाशिक-जगण्याच्या लढाईत वादळं यायलाच हवीत. त्याशिवाय आपली क्षमता कळत नाही. तद्वतच आयुष्याच्या वाटचालीत कुटुंब सावरतानाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक महिला धडपडत असतात. हीच धडपड यशस्वी करत स्वेटर व्यवसायातून स्वतःला सिद्ध करण्याबरोबरच इतरांसाठी आदर्श ठरलेल्या महिलांपैकी एक नाव म्हणजे ज्योती रानडे. 

  इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या ज्योती अनिल रानडे यांचं माहेर मुंबईतील, तर सासर नाशिकच्या खुटवडनगर येथील. वडील विनायक रामकृष्ण भावे यांचे वीस ते बावीस जणांचे कुटुंब. आरे डेअरीत नोकरी करताना तुटपुंज्या पगारात मोठे कुटुंब चालविणे तसे अवघडच. त्यामुळे ज्योतीताईंना शिकून स्वतःला मोठ्या पगारावर नोकरी करायची होती. मात्र, परिस्थितीमुळे वडिलांनी लवकर लग्न उरकले अन्‌ 1986 मध्ये त्या सासरी आल्या. पती अनिल गोविंद रानडे यांचे शिक्षणही केवळ दहावीपर्यंत. ते व्हीआयपी कंपनीत नोकरीस होते, पण इथेही पगार जेमतेमच. त्यातच सहा भावांचे एकत्रित कुटुंब असल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे.

नक्की वाचा-संजय राऊत बोलले तरी मीच पक्षाचा अध्यक्ष

जबाबदारी खांद्यावर घेतली

कर्ता पुरुष म्हणून अनिल यांची जबाबदारी मोठी होती. ज्योतीताईंनी नोकरीसाठी प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. तरीही काहीतरी करून दाखविण्याची ऊर्जा मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ज्योतीताईंच्या पुण्यातील मावशी स्वेटर विणण्याचे काम करत असत. त्यामुळे या व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे, अशी ज्योतीताईंना अपेक्षा होती. शिवाय पत्नीने काहीतरी करत स्वतःला बिझी ठेवावे यासाठी पतीकडूनही नेहमीच प्रोत्साहन मिळत होते. त्यातून त्यांनी पुण्यात जाऊन प्रशिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवली अन्‌ पुण्यात महिनाभर प्रशिक्षण घेऊन त्या नाशिकला परतल्या. 

आशेचा किरण गवसला 
स्वतःला स्वेटर विणण्याच्या व्यवसायात झोकून देण्याचा निर्णय तर घेतला, पण भांडवलाचा प्रश्‍न होता. त्यासाठी ज्योतीताईंनी शहरातील स्वेटर विणणाऱ्या कारागिरांच्या मदतीने घरून काम करून देण्यास सुरवात केली. यातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढत गेला. मात्र, स्वेटर विणण्याचे मशिन घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यांची गरज ओळखून वडिलांनी 19 हजारांची मदत केली. माहेरच्या या आधारातूनच ज्योतीताईंना आशेचा किरण गवसला. आता स्वतःच्या मशिनवर हे सर्व पुढे नेता येणार होते. व्यापाऱ्यांकडील कच्चा माल त्या पक्का करून देऊ लागल्या. त्या वेळी एका स्वेटरनिर्मितीसाठी त्यांना नऊ रुपये याप्रमाणे दिवसाकाठी साधारण 35 रुपये कमाई होत होती. मात्र, हीच तुटपुंजी कमाई रानडे परिवाराच्या आर्थिक परिस्थितीला कलाटणी देऊन गेली. 

चढउतारावर मात 
ज्योतीताई स्वतःला सिद्ध करत असतानाच पती अनिल यांना आजाराने ग्रासले. मणक्‍यांच्या दुखण्यामुळे त्यांना काम करणे अवघड होत होते. रोज कंपनीत काम करताना दुखणे वाढण्याची भीती त्यांना होती. मात्र, पतीच्या आजारपणात खंबीरपणे उभ्या राहत ज्योतीताई कुटुंबाला आधार देत होत्या. याच काळात मुले सार्थक व योगिनी यांच्यानिमित्ताने कुटुंबातील सदस्यसंख्याही वाढली होती. तोपर्यंत कुटुंब विभक्त झाले असले, तरी परिस्थितीला तोंड देत यश खेचून आणण्याची जिद्द अंगीकारल्यामुळे त्या डगमगल्या नाहीत. याच काळात अनिल यांना आजारपणामुळे स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. 

स्वतःला केले सिद्ध 
स्वेटरनिर्मिती व्यवसायातील बारकावे, जिद्द व चिकाटीच्या जोरावर ज्योतीताईंनी हा व्यवसाय कमालीचा पुढे नेला. केरळ, तमिळनाडू, मुंबई, बेंगळुरूसह देशभरातील अन्यही राज्यांतही त्यांनी स्वेटरसाठी मार्केट मिळविले आहे. त्याचवेळी परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागलेल्या ज्योतीताईंनी मुलांना मात्र उच्चशिक्षित करत स्वतःचे स्वप्न पूर्ण केले. मुलगा सार्थक वाणिज्य शाखेचे शिक्षण घेऊन टॅक्‍स कन्सल्टंट म्हणून जबाबदारी सांभाळतोय, तर मुलीनेही पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ज्योतीताईंच्या व्यवसायासाठी पती अनिल यांच्यासह मुलगा सार्थक, सून सायली, जावई अनिकेत यांचेही पाठबळ मोलाचे ठरत आहे. भविष्यात सुनेने हा व्यवसाय पुढे नेत गरजूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. 

महिलांसाठी ठरल्या आधार, "तनिष्का'चे बळ 

आयुष्यात आलेल्या सर्वच प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे जात ज्योतीताईंनी जवळपास 30 महिलांना कायमस्वरूपी रोजगाराच्या माध्यमातून आधार दिला आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलाही व्यवसाय आपण पुढे नेऊ शकतो. स्वेटर विक्री व्यवसायातून पुढे जातानाच तनिष्का सदस्य असलेल्या ज्योतीताईंना "तनिष्का व्यासपीठ' देत असलेले बळ हे सर्वच महिलांच्या दृष्टीने स्वतःला सिद्ध करण्यासाठीचे पाठबळ असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. 

"तनिष्कां'ना मोफत प्रशिक्षण 
"तनिष्का' व्यासपीठाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत गरजू, गरीब तनिष्का सदस्यांना मोफत प्रशिक्षण देण्याबरोबरच रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ज्योतीताई यांनी घेतली आहे. स्वेटरनिर्मिती हा कधीही बंद न पडणारा व्यवसाय आहे. उलट हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोच आहे. तनिष्का व्यासपीठाने सुचविलेल्या महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यासोबतच रोजगारही देणार असल्याचे त्या सांगतात. याच व्यवसायामुळे आज ज्योतीताई रानडे यांना महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही स्वतःची ओळख निर्माण करता आली. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर खेचून आणलेल्या या यशातून ज्योतीताईंनी महिलांसाठी नक्कीच आदर्श निर्माण केला आहे. 
संपर्क ः ज्योती रानडे ः मो. 9922727261 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news swatter maker jyothi ranade