दुर्गम भागात अखेर गाढवांवरून पाणी 

live photo
live photo

तळोदा ः मानवाने कितीही प्रगती केली असली तरी भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरत आहे. याचे उदाहरण म्हणून तळोदा तालुक्यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागातील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम नेत प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. 
 
कुयरीडांबर, पालाबार, चिरमाळ या दुर्गम भागातील गावाना पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. उपाययोजनांबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असला तरी या भागात लहान टॅंकरही जायला रस्ते नसल्याने प्रशासनही हतबल झाले होते, त्यावर ग्रामस्थांनीच सुचविलेल्या पर्यायाचा विचार करीत गाढवांच्या पाठीवरून पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबत प्रशासनाने आधीच निर्णय घेतला होता, मात्र वेळेवर गाढव उपलब्ध होत नव्हते, ते आज मिळाले. 

स्वातंत्र्याची सत्तरी उलटल्यानंतरही या गावांना जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने पायवाटेनेच जावे लागते. पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. रस्ता नसल्याने तात्काळ उपाययोजना करणे अवघड आहे. वनजमिनींचाही प्रश्न आहे, याबाबत विषयाचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार पंकज लोखंडे स्वतः सहकारींना घेत घटनास्थळी जाऊन आले. 
या दुर्गम भागातील पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पाड्यांमधील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी शेवटचा पर्याय म्हणून गाढवांचा वापर करावा असे सुचविले होते. 
त्यानुसार आज पायवाट तुडवित तहसीलदार लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, ग्रामसेवकांनी सात ते आठ किलोमीटर पायपीट करीत संबंधित गावात धाव घेतली. केवलापाणीपर्यंत सर्व अधिकारी वाहनाने पोहचले. तेथून डोंगर चढून प्रवास केला. अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. गावात पहिल्यांदा अधिकारी पाहून ग्रामस्थ देखील अवाक झाले होते. 

ग्रामस्थांकडे १७ गाढव असून केवलापाणी व पानबारी येथील विहिरीच्या माध्यमातून कुयलीडाबरी येथे गाढवाच्या साह्याने पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. दरम्यान कुयलीडाबर येथे ३ विहिरी असून केवळ एका विहिरीत झरा पाझरता आहे. त्यातून गावाची पाण्याची तहान भागवणे शक्य नसल्याने ग्रामपंचायतीमार्फत खोलीकरण व ब्लाॅस्टीगचे कामे सुरू असून २० ते २५ फूट खोलीकरण करूनही याठिकाणी पाणी लागलेले नाही, पर्याय म्हणून केवलापाणी पावेतो ट्रॅकरने पाणी नेऊन पुढे गाढवाच्या सहाय्याने पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. 

दुर्गम भागातील गावांमध्ये रस्त्यांअभावी टॅंकर जाऊ शकत नसल्याने जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशांन्वये गाढवाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. चौगाव ग्रामपंचायतींतर्गत चेरीमाळ येथे नाल्यात विहिर खोदण्यात आली असून जलवाहिनीच्या सहाय्याने जेंदाफडीमार्गे वरील गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. 
- सावित्री खर्डे, गटविकास अधिकारी,तळोदा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com