खर्डी नदीचे अखेर खोलीकरण सुरू; जिर्ण पूल पाडला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

‘सकाळ'ने विस्तृत वस्तुस्थितीदर्शक वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत अखेर खोलीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

तळोदा (नंदुरबार) : खर्डी नदीचे खोलीकरण करण्याचे काम अखेर सुरू झाले आहे. नदीतील दक्षिणेकडील जीर्ण पूल पाडण्यात आला असून तेथील गाळ काढून नदी मोकळी केली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. या प्रश्नावर ‘सकाळ'मध्ये वृत्तमालिका प्रसिद्ध होऊन काम करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी पालिकेला आदेश दिले होते. 
नगरपालिकेनेही तात्काळ कार्यवाही करत नियोजन सुरू केले होते, त्यात नदीत होणाऱ्या या खोलीकरण कामासाठी पोकलेन मशीन तळोद्यात नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. शहरात कोणाकडेही पोकलेन मशिन नसल्याने काम सुरू होऊ शकले नव्हते. अखेर तहसीलदार पंकज लोखंडे, नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या प्रयत्नाने पोकलेन मशीन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे खोलीकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. 
पोकलेन मशीन उपलब्ध व्हावे म्हणून तीन दिवसांपासून सतत प्रयत्न करणारे तहसीलदार लोखंडे, नगराध्यक्ष परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा कार्यस्थळी उपस्थित होते. यात आता तेथील सर्व गाळ काढून नदी पात्र मोकळे केले जाणार आहे. पूर येतो त्यावेळी याच भागात अडथळा निर्माण होऊन पाणी निघण्यास अडचणी येतात. त्यात पावसाळ्यात खर्डी नदीला मोठा पूर येत असल्याने हातोडा रस्त्यावरील विद्यानगरी व शासकीय कार्यालय जलमय होत असतात. खर्डी नदीचे पात्र दक्षिणेकडे लुप्त झाल्याने पाणी निघण्यात अडचणी येतात. कॉलेज रोड रस्त्यावर देखील त्यामुळे फुगवटा वाढून परिसर जलमय होतो. ‘सकाळ'ने विस्तृत वस्तुस्थितीदर्शक वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत अखेर खोलीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tadoda khardi river Deepening and Dilapidated bridge collapsed