वन विभागाला पक्षी सप्ताहाचा पडला विसर, अन्यथा दुर्मीळ प्रजातींची झाली असती नोंद !

वन विभागाला पक्षी सप्ताहाचा पडला विसर, अन्यथा दुर्मीळ प्रजातींची झाली असती नोंद !

तळोदा ः वृक्षलागवड व त्यांचे संगोपन करण्याबरोबरच प्राणी व पक्षी यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी असलेल्या वनविभागाला पक्षी सप्ताह राबविण्याचाच विसर पडला आहे. तळोदा वनविभागाने पक्षी सप्ताह राबविला असता, तर तळोदा वनक्षेत्रातंर्गत अधिवास असलेल्या विविध पक्ष्यांसोबतच क्रिट्रिकली डेंझर झोन मध्ये गणना होत असलेल्या गिधाड व वनपिंगळा या दुर्मीळ प्रजातींबाबत महत्त्वपूर्ण व ठोस अशी माहिती प्राप्त झाली असती. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे त्या उपयुक्त माहितीला सर्वजण मुकले आहेत. त्यामुळे पक्षी मित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवस (५ नोव्हेंबर) ते पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती (१२ नोव्हेंबर) दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 'पक्षी सप्ताहाचे' आयोजन करण्यात येते. या सप्ताह दरम्यान निरीक्षण सहली, पक्षितज्ज्ञांशी चर्चा, पक्षींचा संवर्धनांबाबत जनजागृती, पाणथळ जागांचे संवर्धन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 

तळोदा वनविभागाला विसर 
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पक्षी मित्र व संघटनांच्या सहकार्याने वनविभागामार्फत हा सप्ताह मोठ्या उत्साहात राबविण्यात आला, मात्र तळोदा वनविभागाला त्याचा विसर पडला आहे. वास्तविक तळोदा वनक्षेत्रात पारवे, खंडया, हळद्या, शेकाट्या, पाणकोंबड्या, कवड्या कबुतर, साळूंक्या, करडा धोबी, वेडा राघो, घार, शिक्रा, भारद्वाज, लावऱ्या, चंडोल, तितर, खाटीक, सुतार, शिंगचोच्या, कोतवाल, बगळे, काळा शराटी, करकोचा, कोकीळ, सुगरण, चातक, सातभाई, पॅराकीट, मोर अशा असंख्य पक्ष्यांचे अधिवास आहे. यापूर्वी तळोदा वनविभागाने पक्षी गणना करीत त्यादरम्यान आढळलेल्या विविध प्रजातींची नोंद केली आहे. त्यामुळे तळोदा वनविभागाने पक्षी सप्ताह राबविला असता तर विविध पक्ष्यांची सध्याची उपयुक्त माहिती मिळाली असती, मात्र आता ती मिळणार नाही. त्यामुळे पक्षी मित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

दुर्मीळ प्रजातीबाबत अनभिज्ञ 
तळोदा वनक्षेत्रात अतिशय दुर्मीळ व क्रिट्रिकली डेंझर झोन मध्ये गणना होत असलेले 'वनपिंगळे' कोठार, तोरणमाळ या परिसरात तर 'गिधाड' सोजरबारचा परिसरात यापूर्वी आढळले असून व त्यांची तशी नोंद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे जर पक्षी सप्ताह राबविला असता गिधाड व वनपिंगळा या दोघेही दुर्मिळ पक्ष्यांबाबत महत्त्वाची व ठोस माहिती प्राप्त झाली असती. 

कोरोनातील बदल कळला असता 
यावर्षी कोरोनाचा महामारीमुळे अनेक बदल घडले आहेत. कोरोना काळातील बदल पक्षी, प्राणी यांच्यासाठी उपयुक्त असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे कोरोनामुळे पक्ष्यांच्या जातींवर काही फरक पडला आहे का? कोणत्या पक्ष्यांची संख्या कमी किंवा जास्त झाली आहे? कोणत्या भागात कोणता पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतो? अशी उपयुक्त माहिती पक्षी सप्ताह दरम्यान मिळाली असती.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com