भाजपसमोर चक्रव्यूह; युती, आघाडीवरच विजयाचे गणित 

भाजपसमोर चक्रव्यूह; युती, आघाडीवरच विजयाचे गणित 

तळोदा ः विधानसभेच्या शहादा-तळोदा मतदारसंघात जोरदार लढत होण्याचे संकेत असून विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासह माजी सैनिक रूपसिंग पाडवी, आमदार पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी आदींनी भाजपतर्फे झालेल्या मुलाखतीत उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. पक्षाकडे रीतसर उमेदवारीची मागणी केली. दुसरीकडे कॉंग्रेसमधून माजी क्रीडामंत्री ऍड. पद्‌माकर वळवी यांचेच नाव आघाडीवर असून कॉंग्रेसकडून कोणताही प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. 
गत विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नसल्याने प्रमुख तीन नेत्यांमध्ये अत्यंत चुरस झाली. यात कॉंग्रेसकडून ऍड. पद्‌माकर वळवी, भाजपकडून उदेसिंग पाडवी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राजेंद्र गावित हे दिग्गज रिंगणात होते. यात भाजपचे पाडवी यांनी या चुरशीच्या लढतीत विजय मिळविला. 

भाजपकडून उमेदवारी कोणाला? 
विधानसभेच्या शहादा-तळोदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीची चुरस वाढली असून विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांनी आपला जनसंपर्क अतिशय वेगात वाढविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. रूपसिंग पाडवी यांनीही पक्षात आपल्या सेवेचा दाखला देत उमेदवारी मागितली आहे. त्यात पक्ष कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकते याबाबत भाजपमध्येच नव्हे; तर कॉंग्रेसमध्येही जोरदार चर्चा आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या उमेदवारीकडे लक्ष ठेवून आहेत. राजेश पाडवी हेही भाजपच्या वरिष्ठ पातळीवर संपर्कात असल्याने खानदेशचे संकट मोचनगिरीश महाजन या तीन-चार इच्छुकांपैकी कोणाला संधी देतात, याकडे लक्ष लागून आहे. 
शहादा-तळोद्याचा इतिहास पाहिल्यास 2014 मध्ये युती नसल्याने तीन दिग्गज उमेदवार रिंगणात होते. मात्र, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची ताकद विभागली, त्याचा फायदा भाजपचे उदेसिंग पाडवी यांना निश्‍चितपणे झाला. यंदा मात्र भाजप-शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे संकेत मिळत असले तरी भाजप शिवसेनेसाठी जास्त जागा सोडेल, असे दिसत नाही. त्यामुळे युती तुटू शकते, असेही राजकीय जाणकार सांगतात. कॉंग्रेससोबत आपले नुकसान होऊ नये, यासाठी "राष्ट्रवादी'ही स्वबळावर लढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे युती आणि आघाडीवरच या मतदारसंघातील गणित ठरणार आहे. युती व आघाडी झालीच तर कॉंग्रेस भाजपशी जबरदस्त लढत देईल, मात्र तिसरा उमेदवार राजेंद्रकुमार गावित अथवा त्यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार राहिल्यास भाजपसाठी विजय अधिक सुकर होईल. 

मतविभाजनावरच गणित अवलंबून 
लोकसभा निवडणुकीत शहादा-तळोदा मतदारसंघातील एकूण गावे व बूथनिहाय मतदान पाहिल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीला झालेल्या मतदानाची टक्केवारी इतकी वाईट नसून ती समाधानकारक आहे. त्यामुळे मतविभाजन न झाल्यास भाजपचे उमेदवार व माजी मंत्री ऍड. पद्‌माकर वळवी यांच्यातील लढत काट्याची होईल, यात शंका नाही, 

युती न होण्याचा फायदा 
शहादा-तळोदा मतदारसंघातच नव्हे; तर जिल्ह्यातील चारही जागांवर इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात टाकलेले आहेत. मात्र युती झाल्यास काहींचा पत्ता कट होण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास शिवसेनेकडून उमेदवारी करू तर कॉंग्रेसला जागा सुटल्यास अडचण येईल म्हणून युती होऊच नये म्हणजे "राष्ट्रवादी'कडून तरी उमेदवारी करता येईल, अशी स्थिती आहे. 

अपक्ष ठरणार गिअर चेंजर 
अपक्ष म्हणून उभे राहणाऱ्यांमुळे गणित बदलू शकते. त्यात काही मते खाण्यासाठी असतील, तर काही माघार घेण्याच्या अपेक्षेने उभे राहतील. काही खरोखरच निवडणुकीत स्वतःची वाटचाल शोधतील. मात्र, याचा फटका कोणत्या उमेदवाराला बसेल. अपक्ष उमेदवार आजवर प्रभावी ठरले नसले तरी ते गणित बिघडवू शकतात. एकूणच काय तर भाजपमध्ये असणारी इच्छुकांची गर्दी व एकूण परिस्थिती पाहता "राष्ट्रवादी'ला आपला हक्काचा मतदारसंघ परत मिळविण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करावा लागणार, हे निश्‍चित. 

गटबाजी भोवणार? 
भाजपमध्ये गेल्या पाच वर्षांपासून अंतर्गत गटबाजी असून या मूळ विधानसभा रणसंग्रामात त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम दिसून आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. अनेकदा दिग्गज नेत्यांमध्ये उघड वाद दिसून आले आहेत. वरिष्ठ पातळीवर याबाबत समज देऊनही गटबाजी अगदी ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांपर्यंत दिसून येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com