esakal | बापरे..सीसीटीव्हीची नजर झाली कमजोर; त्‍याचा होतोय असा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

cctv camera

गुन्हेगारांवर व रोडरोमियोंवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र पाच वर्षांपासून हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहे. 

बापरे..सीसीटीव्हीची नजर झाली कमजोर; त्‍याचा होतोय असा परिणाम

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : शहरात सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा पाच वर्षापासून बंद पडली. ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेण्याची अपेक्षा सर्वसामान्य तळोदेकर नागरिकांनी व्यक्त केली आहे. 
शहरात गुन्हेगारांवर व रोडरोमियोंवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत शहरातील मेन रोड वरील आनंद चौक, मारुती मंदिर, स्मारक चौक, खाज्या नाईक चौक व प्रशासकीय इमारत अशा संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र पाच वर्षांपासून हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहे. 

वर्षभर चालली यंत्रणा 
शहरात लावलेली ही सीसीटीव्हीची यंत्रणा फक्त वर्षभर चालली होती. त्यानंतर देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेचा करार संपुष्टात आला. त्यानंतर त्या सीसीटीव्हीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या वायर खराब अथवा तुटल्या. दरम्यान सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत व मेन रोडवर छोट्यामोठ्या चोऱ्यांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजची चांगली मदत झाली होती. 

नूतन पोलिस निरीक्षकांकडून अपेक्षा 
तळोद्याचे पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मागील पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणार असे बोलून दाखवले होते. त्यासाठी व्यावसायिकांची बैठक घेऊन विषय देखील मांडण्यात आला होता. मात्र त्यांची अगदी थोड्या कालावधीनंतर बदली झाल्याने पुन्हा हा विषय नव्याने सुरू करावा लागणार आहे. त्यासाठी नूतन पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांच्याकडे ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मोठी संधी आहे. 

शासकीय इमारतीत हवा सीसीटीव्‍ही 
प्रशासकीय इमारतीतही केवळ पोलिस स्टेशन लॉकअप व पोलिस निरीक्षक दालन येथीलच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. प्रशासकीय इमारत सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कार्यालयांच्या आत-बाहेर देखील सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारतीत देखील सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे