नियमांचे उल्लंघन; साडेनऊ लाखांचा दंड वसूल 

राजेंद्र मगरे
Friday, 4 December 2020

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउन कालावधीत दुचाकी व इतर वाहनांवर तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी दंडात्मक कारवाई केली. मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आमलाड (नंदुरबार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तळोदा शहर व तालुक्यातील सुमारे एक हजार ९४० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत तळोदा पोलिसांनी नऊ लाख ६७ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला. ही कारवाई मे ते नोव्हेंबरअखेर अशा सात महिन्यांत केली. शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासन, आरोग्य विभागाबरोबर पोलिसांनी योगदान दिले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरूच असल्याचे पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांनी सांगितले. या कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. 
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउन कालावधीत दुचाकी व इतर वाहनांवर तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी दंडात्मक कारवाई केली. मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेश शिंगोटे व पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांनी कारवाईत सातत्य ठेवले. त्यामुळे लोकांना मास्क लावूनच घराबाहेर पडण्याची सवय लागली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मर्यादित राहण्यात मदत झाली. पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांची मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अविनाश केदार, उपनिरीक्षक अभय मोरे, ज्ञानेश्वर पाकळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. 
 
अशी केली कारवाई 
कारवाईत एक हजार ९४० व्यक्तींकडून एकूण नऊ लाख ६७ हजार तीनशे रुपयांवर दंड वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक मास्क न लावणाऱ्या एक हजार १५४ जणांकडून पाच लाख ७४ हजार रुपये, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ७८२ व्यक्तींकडून तीन लाख ९० हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावरून दोन व्यक्तींकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 

कोरोना संसर्ग नियंत्रणात 
तळोदा शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रथम रुग्ण जूनच्या सुरवातीला आढळला. त्यानंतर शहरात संसर्गाला सुरवात झाली. तत्काळ उपचार, रुग्णहिस्‍ट्रीनुसार संबंधितांचे विलगीकरण करणे, परिसर सॅनिटाइझ करणे आदी कृती शीघ्रतेने करून संसर्ग नियंत्रण करण्याच्या प्रयत्नांना यश आले. रुग्णसंख्या मर्यादित राहिली. त्यामुळे रिकव्हरी रेट चांगला राहिला. जून ते आजतागायत शहर व तालुक्यातील दोन हजार ८५४ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. पैकी दोन हजार २०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ६४५ जण पॉझिटिव्ह आले. यांपैकी ५९२ व्यक्ती कोरोनावर मात करून बऱ्या झाल्या आहेत. आता २९ जणांवर उपचार सुरू घेत आहेत. कोरोनामुळे २४ जणांनी प्राण गमावले. 
 
संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda corona virus no follow rules and penal charge