तळोदा, नंदुरबार प्रकल्पात ‘मोबाईल ॲप’ची निर्मिती

 तळोदा, नंदुरबार प्रकल्पात ‘मोबाईल ॲप’ची निर्मिती

तळोदा  ः आदिवासी विकास विभागाच्या विकासकामांचे दैनंदिन संनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी तळोदा व नंदुरबार प्रकल्प कार्यालयांनी संकेतस्थळ व मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपद्वारे आश्रमशाळा, वसतिगृहे व विविध विकास योजनांची माहिती संकलित करणे सुलभ होणार आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या मोबाईलमध्ये दैनंदिन फिरती माहिती संकलित करणार आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तळोदा व नंदुरबार प्रकल्प कार्यालयात या मोबाईल ॲपचे उद्‍घाटन करण्यात आले. 


नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे. जिल्ह्याची दुर्गमता, वाहतूक व दळणवळण सुविधांचा अपुरा विकास आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता त्यामुळे विकासकार्यावर बऱ्याच मर्यादा येतात. त्यात आदिवासी भागातील आश्रमशाळा, वसतिगृहे आणि विकासकामांचे पर्यवेक्षण, संनियंत्रण, मूल्यमापन करताना अडचणी येतात. त्यावर प्रभावी उपाय म्हणून नंदुरबार व तळोदा या दोन्ही प्रकल्पांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प कार्यालयाची सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय अधिकारी यांच्या कामकाजावर संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रणासाठी व सर्व माहितीचे संकलन डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

ऑफलाइनही वापरता येणार 
तळोदा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा आणि नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून मोबाईल ॲपची निर्मिती झाली आहे. जीपीएस फोटो प्रणालीमुळे या ॲपवर फोटोदेखील अपलोड केले जाणार आहेत. प्रकल्प कार्यालयाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी या ॲपचा वापर करता येणार आहे. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठविली जाणार आहे. तळोदा प्रकल्पाचे कार्यक्षेत्र भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम असल्याने मोबाईल ॲप ऑफलाइन स्वरूपातदेखील वापरता येणार असून, मोबाईल नेटवर्क रेंजमध्ये आल्यावर संकलित केलेली माहिती आपोआप संकेतस्थळावर अपलोड होऊन डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहू शकणार आहे. 

मंत्री पाडवींच्या हस्‍ते उद्‍घाटन 
तळोदा व नंदुरबार प्रकल्पांच्या या संकेतस्थळाचे व मोबाईल ॲपचे प्रकल्प कार्यालयात शनिवारी (ता. १५) औपचारिक स्वरूपात उद्‍घाटन करण्यात आले. आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी यांनी आदिवासी विकास विभाग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकासकामांचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. 

संंपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com