
दलेलपूर रोडवरील रोकडमन हनुमान मंदिराचा शेजारी संदिप धरमदास सूर्यवंशी (रा. तळोदा) यांची जेमतेम दोन ते अडीच एकर शेती आहे. शेतात त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करीत तैवान पिंक पेरुची फळबाग फुलवली आहे.
तळोदा (नंदुरबार) : कठोर परिश्रम व जिद्दीचा जोरावर येथील अल्पभूधारक शेतकरी संदिप सूर्यवंशी यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. त्यांनी धाडस दाखवत शेतात तैवान पिंक पेरुची लागवड करीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत इतर शेतकऱ्यांसमोर एक उदाहरण निर्माण केले आहे. सूर्यवंशी यांची फळबाग पाहण्यासाठी असंख्य शेतकरी हजेरी लावत आहेत.
दलेलपूर रोडवरील रोकडमन हनुमान मंदिराचा शेजारी संदिप धरमदास सूर्यवंशी (रा. तळोदा) यांची जेमतेम दोन ते अडीच एकर शेती आहे. शेतात त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करीत तैवान पिंक पेरुची फळबाग फुलवली आहे.
अधिक उत्पन्नासाठी लागवड
पारंपरिक शेतीमध्ये एका मर्यादेत उत्पन्न मिळते. अधिक उत्पन्न मिळवायचे असेल, तर शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही. हे हेरुन येथील अल्पभूधारक शेतकरी संदिप सूर्यवंशी यांनी आपल्या शेतात तैवान पिंक पेरुंची लागवड करण्याचा निर्णय घेतला. संदिप सूर्यवंशी यांनी हॉर्टिकल्चरचा कोर्स केलेला आहे. त्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून तैवान पिंक पेरुची रोप विकत घेत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शेतात रोप लावलीत. मर्यादित क्षेत्र असल्याने त्यांनी फक्त पाऊण एकर क्षेत्रावर 3 बाय 8 अंतरावरच तब्बल 800 रोप लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. यादरम्यान त्यांना एकूण 1 लाख रुपये खर्च आला.
परिस्थितीशी दोन हात
संदिप सूर्यवंशी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे जो निर्णय घेतला आहे; तो यशस्वी करुन दाखविल्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर नव्हते. त्यांना पेरुंची फळबाग फुलवतांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र परिस्थितीशी दोन हात करीत समोर आलेल्या सर्व संकटांवर त्यांनी मेहनतीने व जिद्दीने मात केली आणि फळबाग फुलवली. यावर्षी सप्टेंबर महिन्यात पेरु निघण्यास सुरुवात झाली व नोव्हेंबरपर्यंत त्यांनी पेरुंचे उत्पादन घेतले. पहिल्याच प्रयत्नात मोठ्या प्रमाणावर पेरुंचे उत्पादन घेत, नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करुन दाखविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुण्यात असतांना नर्सरीचे अनेक काम केली होती तो अनुभव शेतात तैवान पेरुंची लागवड करीत फळबाग फुलवितांना कामी आला. यंदा तैवान पेरुला किलो मागे 50 रुपये दर मिळाला. त्यामुळे समाधानी असून पुढील हंगामात देखील पेरुंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्याबाबत आशावादी आहे. मी इतर शेतकऱ्यांना याबाबत काही माहिती हवी असल्यास ती देण्यास तयार आहे.
- संदिप सूर्यवंशी, शेतकरी, तळोदा.
संपादन ः राजेश सोनवणे