निसर्गाचा लहरीपणाचा रब्बी पिकांना बसणार फटका 

सम्राट महाजन
Thursday, 17 December 2020

पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होवू नये किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे.

तळोदा : तालुक्यातील ठिकठिकाणी पडलेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व पडलेलं धुकं यामुळे रब्बीतील गहू, हरभरा यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून निसर्गाचा लहरीपणामुळे या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार आहे.

आवश्य वाचा- खडसेंच्या निकटचा आमदार देणार भाजपचा राजीनामा; पुन्हा निवडणूक लढणार

तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना अधून मधून निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसत आला आहे. मात्र यावर्षी खरिपात व आता रब्बीचा सुरुवातीलाच शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणाला सामोरे जावे लागले आहे. यावर्षी खरिपाचा हंगामात ऑगस्ट महिन्यात पावसाने संततधार लावून धरली होती, ऐन पिकं काढण्याचा वेळीच पडलेल्या पावसाने कापूस, सोयाबीनसह उडीद, मका आदी पिकांना जोरदार फटका दिला होता.

रब्बीच्या सुरुवातीलाच फटका 
यंदा चांगला पाऊस झाल्याने व हिवाळ्यात देखील थंडीचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने, रब्बीत चांगले उत्पन्न घेण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील बळीराजा कामाला लागला होता, मात्र त्याचा पदरी रब्बी हंगामाचा सुरुवातीलाच निराशा पडली आहे. तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या शुक्रवारी, शनिवारी व रविवार असे तीन दिवस अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. तसेच गेले सात वातावरण देखील ढगाळ होते व दोन दिवसांपासून ठिकठिकाणी धुकं देखील मोठ्या प्रमाणावर पडले होते. एकंदरीत वातावरणातील या बदलामुळे पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.

दुहेरी आर्थिक फटका 
वातावरणातील या बदलांमुळे रब्बीतील गहू, हरभरा व तूर यांच्यावर मर, मावासह विविध प्रकारची कीड पडत, पिकांचे नुकसान होत, उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होवू नये किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 वाचा- आर्थिक गणनेत चुकीची माहिती दिल्यास होणार दंडात्मक कारवाई -

मोठ्या आशेने शेतात गहूची लागवड केली आहे. मात्र हंगामाचा सुरुवातीलाच पडलेला अवकाळी पाऊस व गेल्या सात दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व पडत असलेले धुकं, यामुळे यंदा गहूला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- रविंद्र पटेल
शेतकरी, चिनोदा.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda farmer has found himself in a double dilemma due to the natural calamity