तळोदा तालुक्यात ७१ लाखाचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

ठिकठिकाणी दोनशेपेक्षा जास्त लहान - मोठी झाडे उनमडून पडली होती. काही झाडे व फांद्या पडून घराचे व संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

तळोदा (नंदुरबार) : तालुक्यातील अनेक गावांना गेल्या शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा बसला होता. त्यात घरांचे व पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामे केले असून त्यात ६३७ घरांचे २६ लाखांचे तर ५२० शेतकऱ्यांचे २८५ हेक्टरवरील विविध पिकांचे जवळपास ४५ लाखांचे असे एकूण ७१ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

तालुक्यातील मोड, कळमसरे, तऱ्हावद, खरवड, रेवानगर, भवर, बोरद, खेडले, मोरवड आदी गावांना वादळाचा फटका बसला आहे.सुमारे १४७ हेक्टरवरील केळीचे, १ हेक्टर भाजीपाल्याचे, १ हेक्टर पपई, १३६ हेक्टर ऊसाचे असे ५२० शेतकऱ्यांचे २८५ हेक्टरवरील पिकांचे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच ठिकठिकाणी दोनशेपेक्षा जास्त लहान - मोठी झाडे उनमडून पडली होती. काही झाडे व फांद्या पडून घराचे व संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

गावनिहाय घरांचे नुकसान 
मोड येथील १०६, कळमसरे येथील ४५, तऱ्हावद येथील ३९, रेवानगर येथील ८, भवर येथील २५, बोरद येथील १०, खरवड येथील १०४ अशा एकूण ६३७ घरांचे २६ लाखांचे असे एकूण ७१ लाखांचे नुकसान झाले आहे.तसेच वाऱ्यामुळे विजेचे १४ खांब कोसळले तर काही वाकलेत त्यामुळे तारा तुटून पडल्यात, यामुळे विद्युत वितरण कंपनीचे देखील लाखोंचे नुकसान झाले आहे. 

नुकसानीचे निकष 
किमान ३३ टक्के नुकसान झालेले असेल तर जिरायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची, बागायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळत असते. त्याचप्रमाणे घरांचे अंशतः नुकसान झाले असेल तर ६ हजार रुपयांचा मर्यादेत व घरांचे पूर्ण नुकसान झाले असेल तर ९५ हजार १०० रुपयांची मदत संबंधितांना मिळते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda heavy rain and storm farm loss production