"आयटीआय'च्या विद्यार्थ्याची कमाल...पिकांचे खांब काढण्याची तयार केली कटाई मशिन !

सम्राट महाजन
Monday, 6 July 2020

गेल्या अनेक वर्षांपासून हे मशिन मी स्वतः बनविणारच, अशी पक्की खूनगाठ मी मनाशी बांधली होती. कारण मी स्वतः शेतकरी असून, शेतीसंबंधी माझा व्यवसाय असल्याने पपई, केळीचे खांब काढण्यासाठी खूप खर्च येतो, हे मी जाणून होतो. त्यामुळे आता मशिन तयार झाल्याने मला खूप आनंद होत आहे. 
-हंसराज राजकुळे, मशिनचा निर्माता 

तळोदा (नंदुरबार) : काहीतरी नवीन करण्याची जिद्द व त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती असली, की कोणतेही स्वप्न साकार होत असते. येथील हंसराज राजकुळे या तीस वर्षीय आयटीआय केलेल्या युवकाने केळी, पपई, एरंडी यांसारखे पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्या पिकांचे खांब शेतातून काढण्यासाठी एक कटाई मशिन विकसित केले आहे. या मशिनमुळे शेतकऱ्यांची आर्थिक व वेळेची बचत तर होणारच आहे सोबत सदर पिकांचे बारीक-बारीक तुकडे होऊन त्यापासून खतदेखील तयार होणार आहे. 

आवर्जून वाचा - सावधान...लॉकडाउनमध्ये फिरणार तर काय होणार तुमच्यासोबत पहा; १३०० पोलिसांचा कडक बंदोबस्त

शेतकऱ्यांनी केळी, पपई, कापूस व एरंडी यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर विशेषतः केळी व पपईचे खांब काढणीसाठी व काढलेले खांब इतर ठिकाणी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तसेच अनेकदा काढलेले ते खांब नदी किंवा तलावात फेकण्यात येतात. त्यामुळे बऱ्याचदा नदीतून अथवा तलावातून पावसाचे पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हे सर्व हेरून शहरातील हंसराज राजकुळे या युवकाने आपल्याच वर्कशॉपमधील काही टाकावू वस्तू, तर काही नवीन वस्तू विकत घेऊन केळी, पपई, एरंडी आदी पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांचे खांब काढण्यासाठी एक कटाई मशिन तयार केले आहे. या मशिनमुळे संबंधित पिकांच्या खांबांचे बारीक-बारीक तुकडे होऊन ते जमिनीत मिसळून त्यापासून खतदेखील तयार होणे शक्य आहे. हंसराज राजकुळे यांनी चार दिवसांपूर्वीच हे कटाई मशिन तयार केले असून, त्याचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांचा शेतातील केळी पिकांचे खांब काढण्यासाठी करण्यात आला आहे व तो मोठ्या प्रमाणावर यशस्वीदेखील झाला आहे. 

मशिनची निर्मिती 
हंसराज राजकुळे या युवकाने आयटीआय केले असून, याआधीही त्यांनी कूपनलिकामधील मोटार काढण्यासाठी मशिन बनविले आहे. त्यांनी हे मशिन तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील पत्रा, चार इंच सी चॅनल, पाटा, एक्सेल, पिष्टन इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. मशिन बनविण्यासाठी त्यांना सात दिवस लागले असून, त्यासाठी त्यांना भूषण सूर्यवंशी, रमेश मगरे, सुरेश पाडवी, लक्ष्मण ड्रायव्हर यांनी मदत केली आहे. 

मशिनची कार्यपद्धती 
हे कटाई मशिन ४५ एच. पी. व त्यापुढील ट्रॅक्टरला जोडल्यावर काम करते. ट्रॅक्टरच्या पुढील भागाद्वारे खांब खाली पाडण्यात येते व त्यानंतर खाली पडलेले खांब ट्रॅक्टरच्या खालून ट्रॅक्टरला जोडलेल्या या मशिनमध्ये जाते व त्यानंतर मशिनच्या धारदार पात्यांमध्ये खांब आल्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे होतात. हेच तुकडे जमिनीत मिसळल्यानंतर त्यापासून खत तयार होते. 

शेतकऱ्यांची आर्थिक, वेळेची बचत होणार 
साधारणतः १० एकर शेतातील केळीचे खांब काढण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास २०-२५ हजार खर्च येऊन सात दिवसांचा कालावधी लागतो. मात्र या मशिनच्या सहाय्याने ते खांब एका दिवसात निघू शकतात व त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. त्यामुळे या मशिनच्या सहाय्याने पपई, एरंडी व केळीचे खांब काढल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व वेळेची बचत होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda iti student create banana and papaya production poll machine