शाळा व अंगणवाडी विकासासाठी जैतादेही पॅटर्न राज्यभर 

फुंदीलाल माळी
Wednesday, 2 December 2020

शाळा परिसराचा विकास होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी व जिल्हा परिषद शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

तळोदा : जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्यांच्या भौतिक विकासासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या उपयोग करता येणारा जैतादेही पॅटर्न राज्यभर वापरला जाणार आहे. त्यासाठी शाळा व अंगणवाडीतील भौतिक विकासाची कामे रोजगार हमी योजनेत सुचविण्यात आली आहेत. त्यामुळे शाळा व अंगणवाड्यांच्या भौतिक विकासासाठी आणखी एका योजनेची मदत मिळणार आहे.

आवश्य वाचा- खडतर आव्हाने पार करीत रेणुकाने स्वप्न साकारले; आणि बीएसएफमध्ये खानदेशातील पहिली तरुणी म्हणून झाली भरती !

 

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांच्या विकास नेहमी महत्त्वाचा विषय राहिला आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यात महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी आजही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी अविरत प्रयत्न केले जातात. शाळा परिसराचा विकास होण्यासाठी शिक्षण विभागासोबतच विविध विभाग नेहमी कार्यरत असतात.

यात भर म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचा व अंगणवाड्याचाही भौतिक विकास करण्यासाठी शासनाने कामे सुचविली आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात जैतादेही गावाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गट विकास अधिकारी व जैतादेही शाळेच्या शिक्षकांनी मनरेगा योजनेचा माध्यमातून शाळेच्या विकास केला होता. तोच जैतादेही पॅटर्न राज्यात राबविण्याची योजना आहे. या कामात अमरावती जिल्ह्यातील 40 टक्के शाळांचे प्रस्ताव या माध्यमातून प्राप्त झाले आहेत.

इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक दर्जा वाढविण्यासाठी देखील प्रस्ताव यावेत म्हणून ही कामे सुचविण्यात आली आहेत. यामुळे शाळा परिसराचा विकास होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी व जिल्हा परिषद शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान विविध प्रकारच्या योजनांचा निधी ग्राम स्तरावर खर्च केला जातो. त्यामुळे शासनाने शाळा व अंगणवाडी यांच्या विकासासाठी आणखीन एका योजनेची भर घातल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 

वाचा- महाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत करता येणारी कामे
शाळेसाठी किचन शेड 
रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना 
शोषखड्डा
शौचालय 
खेळाचे मैदान तयार करणे
संरक्षक भिंत
वृक्षलागवड करणे 
आवश्‍यकतेनुसार पेवर ब्लॉक बसवणे
शाळा व अंगणवाडी परिसरात काँक्रीट नाली बांधकाम
शाळा व अंगणवाडी कडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे बोअरवेल पुनर्भरण 
गांडूळ खत प्रकल्प 
नाडेप कंपोस्ट  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda jaitadehi pattern school and anganwadi development state